नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून पत्नीला पतीकडून बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर अखेर महिलेचा यात मृत्यू झालेला आहे. पत्नीचा खून झाल्याचे समजताच आरोपी कुलूप लावून पसार झाला. घरमालकाने अखेर पोलिसात आरोपी पतीच्या विरोधात फिर्याद दिलेली असून शेवगाव येथील नेहरूनगर येथील ही घटना आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सुमी रफीकुल सरदार ( वय 29 ) असे मयत पत्नीचे नाव असून इस्माईल मकसूद मलिक ( मूळ राहणार पश्चिम बंगाल ) असे आरोपीचे नाव आहे. खोली मालक निर्मला कदम यांनी शेवगाव पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे. एका महिलेच्या सांगण्यावरून निर्मला कदम यांनी या परप्रांतीय जोडप्याला खोली भाड्याने दिलेली होती.
कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात कायम वाद होत होता. बुधवारी रात्री त्यांच्या पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली त्यानंतर आरोपी इस्माईल याने पत्नीला मारहाण केली . फिर्यादी महिला यांना फोनवर माझ्या पत्नीला मी मारहाण केलेली आहे ती उठत नाही त्यामुळे मी आता खोलीला कुलूप लावून निघून गेलेलो आहे असे त्याने सांगितले.
फिर्यादी निर्मला कदम यांनी त्यानंतर तात्काळ पोलिसांना संपर्क केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी आरोपीच्या पत्नीच्या नाकातोंडातून रक्त येत होते. तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे करत आहेत.