संतोष देशमुख यांच्या हत्येची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल , बजरंग सोनवणे म्हणाले की.. 

शेअर करा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत. 

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील दखल घेतलेली असून आयोगाने स्वतंत्र गुन्हा नोंद करून घेतलेला आहे अशी माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिलेली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांची भेट घेऊन बजरंग सोनवणे यांनी कारवाईची मागणी केली होती त्यानंतर हा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

आत्तापर्यन्त पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली हत्यारे , गॅसचा पाईप , त्याच्यावर काळ्या करदोऱ्याने तयार केलेली मूठ , पाच क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप, चार लोखंडी रॉड , लोखंडी फायटर तसेच तलवार सदृश्य हत्यारे जप्त केलेली आहेत. 

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे , सुदर्शन घुले , सुधीर सांगळे , कृष्णा आंधळे , प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी आंधळे हा अद्यापही फरार आहे. देशमुख यांचे लोकेशन आरोपींना दिल्यावरून सिद्धार्थ सोनवणे याला देखील अटक करण्यात आलेली आहे. 

आमदार सुरेश धस मुंबई इथे बोलताना  , ‘ सरपंच संतोष देशमुख यांचा गुन्हा काय होता ? गावातील एका दलित वॉचमनला मारहाण होताना तो रोखायला गेला होता, खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला म्हणून त्याची निर्घृण हत्या केली. संतोष देशमुख पुढं जाऊन जिल्हा परिषद सदस्यही झाला असता पण त्याची हत्या केल्यामुळे कोणताही सरपंच समाजसेवेचं काम करण्यासाठी पुढे येणार नाही,यामुळे सर्वांनी मिळून देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल याची काळजी घ्यायला पाहिजे. ,’ असे म्हटलेले आहे. 


शेअर करा