बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत.
सध्या अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे ,महेश केदार आणि जयराम चाटे अशा आठ जणांवर मकोका कायद्यांतर्गत खटला चालणार असून वाल्मीक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात आला आहे.
महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाईज्ड क्राईम अॅक्ट म्हणजेच मकोका… संघटित गुन्हेगारीवर वचक आणण्यासाठी १९९९ मध्ये हा कायदा आणण्यात आला. ‘टाडा’च्या धर्तीवर मकोका कायदा तयार करण्यात आला. परवानगीचा अर्ज मकोका कायदा कलम २३ (१) नुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जातो. अर्जासोबत आरोपीचे किंवा गुन्हेगारी टोळीच्या मागील १० वर्षांच्या गुन्ह्याचा तपशील दिला जातो आणि अहवालाचा अभ्यास करून मकोका लावल्यास पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी येते. सदर परवानगी मिळाल्यानंतरच मकोकांतर्गत कारवाई केली जाते. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा कायदा असल्याने लवकर जामीन मिळत नाही.