बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत.
सध्या अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे ,महेश केदार आणि जयराम चाटे अशा आठ जणांवर मकोका कायद्यांतर्गत खटला चालणार असून वाल्मीक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात आला आहे.
वाल्मीक कराड याच्यावर मकोका कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे वृत्त येताच कराडच्या समर्थकांचा परळी शहरात धुमाकूळ सुरू झाला आहे. वाल्मीक कराड याच्या काही कार्यकर्त्यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला त्यात ते भाजलेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दुसरीकडे आज परळी शहरात फिरून वाल्मीक कराड याचे समर्थक दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत असून परळी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात बंद आहे. वाल्मीक कराड याच्या पांगरी गावात बुधवारी सकाळी पांगरी कॅम्प येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून गावातील 5 समर्थक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. वाल्मीक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी हे समर्थक रस्त्यावर उतरले असून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.