विवाहित महिलेने जमिनीची हक्कसोड प्रक्रिया केली मात्र त्यानंतर पतीकडून तिला पैशाचा तगादा सुरू झाला आणि त्यानंतर विवाहित महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे 13 तारखेला ही दुर्दैवी घटना घडलेली असून मयत महिलेचा पती याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , छाया विधाटे असे मयत महिलेचे नाव असून नोकरीच्या निमित्ताने ती पतीसोबत सणसवाडी येथील सराटे वस्ती येथे राहत होती. छाया यांचे वडील मोहन व्यवहारे यांचा 2021 मध्ये मृत्यू झाला त्यानंतर हक्कसोड करण्याच्या बदल्यात त्यांच्या पाचही मुलींना एक लाख रुपये देण्याचे ठरलेले होते
आपल्या पत्नीने हक्कसोड केले मात्र त्यानंतर एक लाख रुपये ती घेऊन आली नाही म्हणून तिचा पती विजय विधाटे हा तिला सतत त्रास देत होता. तिचा सतत छळ होत असल्याने तिने हा प्रकार भावंडांच्या कानावर घातला मात्र तरीही पती विजय याच्याकडून सतत त्रास होत असल्याने अखेर छाया विजय विधाटे हिने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . मयत महिलेच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे