पहिला राजीनामा धनंजय मुंडे यांचा घेतला पाहिजे , संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी हे.. 

शेअर करा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत. 

सध्या अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे ,महेश केदार आणि जयराम चाटे अशा आठ जणांवर मकोका कायद्यांतर्गत खटला चालणार असून वाल्मीक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात आला असून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

सीआयडीने वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये मोठा दावा केला असून सरपंच संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली असा दावा सीआयडी आणि एसआयटीने कोर्टात केला आहे. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी आवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. आवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावा सीआयडीकडून करण्यात आला आहे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील वाल्मिक कराडने धमकी दिल्याचं याधीच स्पष्ट झालं आहे. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड याने थेट धमकी देत 2 कोटींची खंडणी मागितली असल्याचेही यापूर्वी समोर आले होते.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मीक कराड यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करत घरगडी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे इतकी संपत्ती कशी आली याची चौकशी झाली पाहिजे असे म्हटलेले आहे.  अंजली दमानिया म्हणाल्या की ,’ धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काय संबंध आहे हे मला स्थापित करायचे होते. एक गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस वाल्मिक कराड आहे. त्याच्यावर 14 एफआयआर दाखल आहेत. त्यानंतर त्याला शासकीय बॉडीगार्ड मिळतात. कोणाच्या सांगण्यावरून त्याला शासकीय बॉडीगार्ड मिळाले? वाल्मिक कराड याला लाडकी बहीण योजनेचे परळीचा अध्यक्ष बनवले गेले ते आपोआप झाले का? धनंजय मुंडे यांच्या शिफारिशमुळे गुन्हेगार वाल्मिक कराड लाडकी बहिणी योजनेचा अध्यक्ष होतो. यासाठी त्यांचा राजीनामा घ्यावा. 

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की , ‘ संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी हे दोन वेगळे गुन्हे नाहीतर एकच गुन्हे आहेत. अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांचे अपहरण 28 मे ला झाले होते. त्यावेळेला मकोका का लावला नाही? सातपुडा बंगल्यामध्ये खंडणीची रक्कम निश्चित झाली होती. हा सातपुडा बंगला कोणाचा ? या सर्व गोष्टींमध्ये धनंजय मुंडे यांचा रोल मोठा आहे. त्यामुळे पहिला राजीनामा धनंजय मुंडे यांचा घेतला पाहिजे .’


शेअर करा