बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत.
सध्या अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे ,महेश केदार आणि जयराम चाटे अशा आठ जणांवर मकोका कायद्यांतर्गत खटला चालणार असून वाल्मीक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात आला असून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सीआयडीने वाल्मिक कराड च्या रिमांड रिपोर्टमध्ये मोठा दावा केला असून सरपंच संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली असा दावा सीआयडी आणि एसआयटीने कोर्टात केला आहे. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी आवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. आवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावा सीआयडीकडून करण्यात आला आहे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील वाल्मिक कराडने धमकी दिल्याचं याधीच स्पष्ट झालं आहे. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड याने थेट धमकी देत 2 कोटींची खंडणी मागितली असल्याचेही यापूर्वी समोर आले होते.
सुरेश धस यांचे माझ्याकडे काही व्हिडीओ आहेत, असा गंभीर आरोप वाल्मिक कराडच्या पत्नीने केला होता यावर सुरेश धस यांनी भाष्य केले आहे. सुरेश धस म्हणाले, “हे बघा मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का? महिला आहे. ती माझी भगिनी आहे. माझ्या भगिनीने केलेल्या आरोपांवर मी काही बोलणार नाही. कोणताही पुरुष असेल त्याने माझ्यावर आरोप करावेत. व्हिडीओ, हे आणि ते, अरे कुठेच काही सापडू शकत नाही. लई धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलो आहे. माझे काही व्हिडीओ सापडणार नाहीत ”, असं स्पष्टच सुरेश धस यांनी म्हटलं.