नगरमध्ये श्रीगोंद्यात शेतजमिनीच्या फसवणुकीचा एक अजब प्रकार समोर आलेला असून संगनमताने शेतजमिनीची बनावट कागदपत्रे बनवून शासकीय यंत्रणेच्या मदतीने संस्थेच्या जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी व्यक्ती असलेले सुजित जाधव हे एका धार्मिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. संस्थेची श्रीगोंद्यात दहा हेक्टर 92 आर जागा असून आरोपी दीपक नामदेव गायकवाड , सतीश डॅनियल भालेराव , वैभव वसंतराव पारधे आणि संदिपान किसान तुपारे या चार जणांनी इंडियन कॅनेडियन प्रेस बिटरियन मिशन यांचे मॉडरेटर यांच्या नावाने तहसीलदारांकडे अर्ज केला आणि तहसीलदारांनी चुकीच्या पद्धतीने सदरची जागा हस्तांतरित केली. मूळ संस्थेसोबत कुठलाही संपर्क त्यांनी केला नाही.
आरोपींपैकी सतीश भालेराव आणि वैभव पारधे यांना हाताशी धरून तेच संस्थेच्या मूळ संस्थेच्या वतीने कामकाज करत आहेत असा प्रकार आरोपींनी निर्माण केला आणि सत्यता तपासण्याची गरज असताना तहसीलदार यांनी बेकायदेशीररित्या दीपक गायकवाड याच्या नावाने जमिनीचा सातबारा केला आणि आरोपीने त्यानंतर आठ हेक्टर जमीन ही संदिपान तुपारे याला विकली. चारही जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.