सव्वा महिना उलटला तरी अद्याप ‘ तो ‘ फरार ,  संतोष देशमुख खून प्रकरण

शेअर करा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग सोबतच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली आहेत. 

सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे ,महेश केदार आणि जयराम चाटे अशा आठ जणांवर मकोका कायद्यांतर्गत खटला चालणार असून वाल्मीक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात आला असून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

सीआयडीने वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये मोठा दावा केला असून सरपंच संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली असा दावा सीआयडी आणि एसआयटीने कोर्टात केला आहे. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी आवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. आवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावा सीआयडीकडून करण्यात आला आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील वाल्मिक कराडने धमकी दिल्याचं याधीच स्पष्ट झालं आहे. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड याने थेट धमकी देत 2 कोटींची खंडणी मागितली असल्याचेही यापूर्वी समोर आले होते.

सदर गुन्ह्यामधील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापपर्यंत देखील फरार असून 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना घडलेली होती. सव्वा महिना उलटला तरी आरोपी हाती आला नसल्याने तपासावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून प्राथमिक तपासात खंडणीला विरोध केला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली असे दिसून आलेले आहे. 


शेअर करा