राहुरी नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर , महिला व्यावसायिकांना प्रचंड त्रास

शेअर करा

शेख युनूस अ. नगर..: राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राहुरी नगर परिषदेचे भव्य दिव्य असे डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे व्यापारी संकुल आहे. या ठिकाणी पूर्वी राहुरी नगर परिषदेची कामगार कॉलनी होती परंतु सदर जागेवर आज रोजी राहुरी नगरपरिषदेने भव्यदिव्य असे व्यापारी संकुल बांधले आहे. सदर व्यापारी संकुलामध्ये अंदाजे कमीत कमी ६० ते ७० गाळे आहेत. सर्व गाळे राहुरी नगरपरिषदेने लिलावी पद्धतीने गाळेधारकांना चालवण्यासाठी दिले आहेत. सदर गाळ्यामध्ये विविध स्वरूपाचे व्यवसाय चालतात आणि या व्यावसायिकांच्या माध्यमातून कर स्वरूपात आर्थिक स्वरूपाची प्राप्ती राहुरी नगर परिषदेला होत असते परंतु आज रोजी हे गाळेधारक वेगवेगळ्या समस्यांनी त्रासले आहेत. 

सदर गाळेधारकांच्या सभोवतालचा परिसर अतिशय अस्वच्छ व घाणीचा झालेला असून मोठ्या प्रमाणात पाणी साचले जाते परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी नेहमीच येत असते परंतु या बाबीकडे राहुरी नगर परिषद प्रशासन नेहमीच काना-डोळा करत आहे . 

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार हे झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसून येत आहे. सदर व्यापारी संकुलामध्ये असणारे स्वच्छतागृह हे अतिशय अस्वच्छ आहे त्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे टॉयलेटचे दरवाजा अक्षरशः निखळून पडला आहे. गाळेधारकामध्ये असणारी मोकळी जागा, जिने, हे अक्षरशः घाणीने माखले आहेत. व्यापारी संकुलामध्ये नेहमीच महिला ग्राहकांची देखील वर्दळ असते परंतु अस्वच्छ टॉयलेट व सुरक्षिततेच्या अभावी महिलांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

सर्व व्यावसायिकांमध्ये राहुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार यांचे विषयी मोठ्या प्रमाणात असंतोष असून  अधिकारी महिलांच्या या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देतील का? अशी चर्चा  या परिसरातील व्यापारी नागरिक व ग्राहक यामध्ये होताना दिसत आहे.


शेअर करा