अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत त्यांना सक्तीच्या रजेवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी पाठवल्यानंतर बोरगे यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती आणि आयुक्तांना पत्र देखील लिहिलेले होते मात्र त्यानंतर आयुक्त यशवंत डांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश जारी केलेले आहेत. त्यासाठी तीन सदस्य समिती देखील नियुक्त करण्यात आलेली आहे.
डॉक्टर अनिल बोरगे यांना ऑगस्ट 2024 मध्ये दोन वेळा नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे रँकिंग हे प्रत्येक महिन्याला घसरत असून त्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस डॉक्टर अनिल बोरगे यांना बजावण्यात आली होती मात्र बोरगे यांनी त्याविषयी समाधानकारक खुलासा केला नाही म्हणून अखेर महापालिका आयुक्तांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले.
आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांवर योग्य ते नियंत्रण ठेवणे ही डॉक्टर अनिल बोरगे यांची जबाबदारी होती मात्र त्यात त्यांनी कर्तव्य कसूरता केली म्हणून अशा वर्तनामुळे कामकाजावर देखील विपरीत परिणाम झाला आणि महापालिकेचे रँकिंग घसरत गेले. सद्य परिस्थितीत प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजुरकर यांची नेमणूक करण्यात आलेली असून आता तीन सदस्य समितीची चौकशीसाठी स्थापना करण्यात आलेली आहे. सात दिवसात समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देखील महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलेले आहेत.