अखेर ‘ तो ‘ बिबट्या झाला जेरबंद मात्र चिमूरडीने गमावले प्राण , पारनेर तालुक्यातील घटना

शेअर करा

नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बिबट्याचा वावर पाहायला मिळत असून पारनेर तालुक्यातील खडकवाडी इथे रोकडे वस्तीवरील एका अल्पवयीन मुलीने बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमावलेले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत ही मुलगी शिकत होती. 

उपलब्ध माहितीनुसार, ईश्वरी पांडुरंग रोहकले असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून 16 जानेवारीला संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ईश्वरीचे वडील घरातील पडवीमध्ये जेवण करत होते त्यावेळी ईश्वरी ही लघुशंकेसाठी बाहेर पडली त्यावेळी मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने ईश्वरीवर हल्ला केला आणि तिला पकडून मक्याच्या शेतात ओढत नेले. 

वडिलांनी आरडाओरडा करत तिथे धाव घेतली त्यावेळी नरभक्षक बिबट्या तिच्याजवळ आढळून आला. वडिलांनी प्रतिकार करत तिची सुटका केली आणि तात्काळ ईश्वरी हिला टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तिचा मृत्यू झालेला होता. 

घटना घडल्यानंतर 17 तारखेला दुपारी चारच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेले आहे. वनरक्षक किरण सुभाष साबळे यांना देखील बिबट्याने पंजा मारला त्यामुळे ते किरकोळ जखमी झालेले असून बिबट्या पकडल्यानंतर परिसरात नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. वडगाव सावताळ येथील नर्सरीमध्ये या बिबट्याला ठेवण्यात आलेले आहे.


शेअर करा