बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख तसेच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध करत बहुजन आंबेडकर चळवळीचे नेते अशोक गायकवाड यांच्यासोबत आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी 17 जानेवारीपासून महापालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे.
अशोक गायकवाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या माहितीप्रमाणे ,’ अहिल्यानगर शहरात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज , महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात यावे ,’ अशी मागणी केलेली आहे.
अशोक गायकवाड यांनी नगर चौफेर प्रतिनिधीसोबत बोलताना ,’ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जो पुण्याच्या शिल्पकाराच्या गोडाऊनमध्ये बंदिस्त आहे तो मुक्त करून 26 जानेवारीच्या आत पुतळ्याचे ऐतिहासिक अनावरण नगर शहरात करून आंबेडकरी जनतेचे स्वप्न साकार करावे. मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे योग्य जागी स्थलांतर करावे आणि पुतळ्याचे पवित्र राखावे ,’ अशी मागणी केलेली आहे.
अशोक गायकवाड पुढे म्हणाले की ,’ नगर शहरातील टिळक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पुनर्बांधणी नव्याने योग्य पद्धतीने करून सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका , व्यायाम शाळा यांची निर्मिती करावी तसेच पिंपळगाव माळवी येथील तलावानजीक 10 एकर जागेत मेडिटेशन हॉल बांधावा. नगर शहरातील सामाजिक न्याय भवन सावेडी येथील जागेची संरक्षण भिंत बांधून प्रवेशद्वारासाठी उपलब्ध निधीचा वापर करावा ,’ अशीही मागणी गायकवाड यांनी केलेली आहे.