नगर शहरात महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी सध्या सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतलेला असून सरकारकडून आलेली पिंक इ रिक्षा योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन वाहनपरवाना दिला जाणार आहे. रिक्षांच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम भरून ही रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार असून महिलांनी पिंक रिक्षासाठी महापालिकेत अर्ज करून लाभ घ्यावा असे आवाहन केलेले आहे.
महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने पिंक ए रिक्षा मोहीम राबवण्यास सुरुवात केलेली आहे. त्या अंतर्गत महिलांना रिक्षाच्या किमतीच्या अवघ्या दहा टक्के रकमेत रिक्षा उपलब्ध होईल आणि उर्वरित 70 टक्के रक्कम बँकांकडून कर्ज स्वरूपात आणि 20 टक्के रक्कम शासन अनुदान स्वरूपात देणार आहे. पात्र महिलांना प्रशिक्षण देऊन त्यानंतर परवाना देण्यात येईल अशी ही योजना असून अनेक महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी देखील ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
अहिल्यानगर शहरात 300 महिलांना रोजगारासाठी रिक्षा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून इच्छुक महिलांनी अर्ज करावेत यासाठी महिलांच्या सुविधेसाठी मोबाईल नंबर देखील उपलब्ध करून दिलेला आहे. संबंधित नंबर हा 97 30 73 85 57 असा असून या नंबरवर या योजनेविषयी अधिक माहिती मिळू शकेल असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलेले आहे. ग्रामीण पातळीवर देखील अशाच स्वरूपाच्या योजनांची सध्या नितांत गरज आहे.