आता अजित पवार यांची भेट घेणार ‘ ही ‘ व्यक्ती , धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार का ?

शेअर करा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग सोबतच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने सध्या सुरु आहेत. 

सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे ,महेश केदार आणि जयराम चाटे अशा आठ जणांवर मकोका कायद्यांतर्गत खटला चालणार असून वाल्मीक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात आला आहे. 

वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावण्यात आल्यानंतर आता त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झालेला आहे. गुरुवारी बीड जिल्हा रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असून रुग्णालयातील परिसरात सीसीटीव्ही देखील लावण्यात आलेले आहेत. 

महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली असून आता या मागणीसाठी अंजली दमानिया या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. एक्स पोस्टवरुन अंजली दमानिया यांनी पुरावे घेऊन अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याचे म्हटलं आहे. सोमवारी संध्याकाळी सात वाजता दमानिया या अजित पवार यांच्या शासकीय निवास्थानी जाऊन भेट घेणार आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. दुसरीकडे, या प्रकरणात सगळ्या प्रकरणाशी संबधित वाल्मीक कराड याच्यावर अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी सातत्याने या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता पुरावे घेऊन अजित पवार यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे हवे आहेत, तर ते द्यायला मी तयार आहे, त्यांनी मला भेटीसाठी वेळ द्यावा असं अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी त्यांनी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली होती.


शेअर करा