गांधी हम शर्मिंदा है आपके कातिल जिंदा है

शेअर करा

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिलेली असून त्यांच्या फेसबुक पोस्टची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे

काय आहे जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट ? 

गांधी कभी मरते नही !

1885 साली काँग्रेसची स्थापना झाली. जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा बंगाल आणि देशातील उच्चवर्णीयांचे काँग्रेसमध्ये वर्चस्व होते. महात्मा गांधीजींचा काँग्रेस प्रवेश होईपर्यंत काँग्रेसचे रूपांतर जनआंदोलनात झाले नव्हते. 1885 ते 1920 मधील काँग्रेस अध्यक्षांची यादी वाचल्यानंतर लक्षात येते की बहुतांश लोक हे उच्चवर्णीय होती. द. आफ्रिकेतून गांधीजी भारतात परतले आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले. 1924 साली ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते जातीने बनिया म्हणजेच बहुजन समाजातील होते. या समाजालाही वर्णव्यवस्थेत फार काही स्थान नव्हते.

1925 साली हेगडेवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. कारण काय असेल हे माहित नाही; पण, कदाचित काँग्रेसमध्ये होत असलेले सामाजिक बदल आणि विविध जातसमूहांचे काँग्रेसकडील आकर्षण यामुळे उच्चवर्णीयांना आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो की काय, असे भय वाटू लागले होते. 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांचे निधन झाले अन् ही भीती अधिकच बळावली. 1929 साल उजाडले आणि लाहोर अधिवेशन आले. त्या आधी दोन वर्षे पंडीत जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. लाहोर अधिवेशनात महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी, सर्व जाती,धर्म, पंथांना काँग्रेसमध्ये सामील होण्याचे आवाहन करून संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर करून घेतला. तेव्हापासून काँग्रेस ही लोकचळवळ झाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना काँग्रेसमध्ये प्रतिनिधीत्व मिळू लागले. काँग्रेसमधील महत्वाची गोष्ट अशी की काँग्रेसमध्ये सुरूवातीपासूनच महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधीत्व दिलं गेलं. 1930 ते 1947 दरम्यानच्या स्वातंत्र्य लढ्याचा विचार करता तो लढा टोकाचा ब्रिटीशविरोधी होता. समाजातील जातीभेद नष्ट करून एकजिनसी समाज उभा रहात आहे, असे चित्र उभे राहिले. महात्मा गांधींजींची विविध आंदोलने ही आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजू लागली. शेतकरी आंदोलन, दांडी यात्रा, चौरीचौरा, चंपारण्य, परदेशी मालावर बहिष्कार, सविनय कायदेभंग ही आंदोलने उभ्या भारताला पेटवत होती. पुण्यात क्षुद्रांना वरील अन्यायाच्या संदर्भात त्यांनी दलित वस्तीला भेट देण्याचे ठरविले. अन् तिथेच त्यांच्या हत्येचा पहिला प्रयत्न झाला. महात्मा गांधींच्या गाडीवर बाॅम्ब फेकण्यात आला. त्यातून ते सुदैवाने बचावले. त्यानंतर सुमारे पाच वेळा त्यांच्यावर हल्ले झाले , हे हल्ले ज्यांनी केले ते सर्व उच्चवर्णीय होते. दोन हल्ले तर स्वतः नथुराम गोडसेने केले. या नथुरामाला सातारचे जिल्हाध्यक्ष भिलारे गुरूजी यांनी पकडले होते. मात्र, मनाने अत्यंत उदारमतवादी आणि विशाल हृदयाच्या महात्मा गांधी यांनी भिलारे गुरूजी यांना चाकू हातात घेतलेल्या गोडसेला सोडण्यास सांगितले होते. हा हल्ला 1942 साली पाचगणी येथे झाला होता. 1942 पासून 1947 पर्यंत त्यांच्यावर आणखी तीन वेळा हल्ले करून जीवे मारण्याचे प्रयत्न झाले.

1942 साली महात्मा गांधीजींनी ब्रिटीशांना निकराचा इशारा दिला . मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1942 च्या चले जाव आंदोलनाला विरोध केला. पण, काँग्रेसने दिलेली चले जाव ही हाक सर्वसामान्यांच्या हृदयाला भिडली होती अन् गावा – गावात, शहरा – शहरात हे आंदोलन पेटू लागले होते. गांधी – नेहरू तुरूंगात असताना बाहेर जनताच नेतृत्व करीत होती. दुसरीकडे दुसरे महायुद्ध टोकाला पोहचले होते ब्रिटन, अमेरिका आणि सोविएत युनियन यांची आघाडी झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डेलानो रुझवेल्ट , ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि सोविएत संघाचे नेते जोसेफ स्टॅलिन या तिघांनी एकत्र यायचे ठरविले. परस्पर विरोधी विचारांची ही तीन राष्ट्रे एकत्र येण्यामागे, हिटलर हा फॅसिस्ट मनोवृत्तीचा होता आणि तो जग पादाक्रांत करेल अन् जगातील मानवता संपवून टाकेल, हा एकमेव विचार होता. या तिघांनी उघडलेल्या आघाडीमुळेच सोविएत संघातील लेनिनग्राड तसेच स्टॅलिनग्राड येथे हिटलरच्या बलाढ्य सैन्याची पिछेहाट झाली. हे झालेले बदल भारतीय समाजालाही समजत होते. तोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक मोठे नेते आणि हेडगेवार यांचे अंत्यत जवळचे स्नेही डॉ. बळीराम शिवराम मुंजे हे इटलीच्या फॅसिस्ट पक्षाचा प्रमुख बेनिटो मुसोलिनी याला भेटून आले होते.

भारतात एका घटका कडून महात्मा गांधी यांच्याविरोधात अपप्रचार सुरू होता. त्याचीच परिणीती महात्मा गांधींजींच्या हत्येत झाली. क्रूरकर्मा नथुराम गोडसेने प्रार्थनेसाठी जाणाऱ्या महात्मा गांधीजींना नमस्कार करतो, असे भासवून त्यांच्या छातीवर गोळ्या झाडून हत्या केली. पण, नंतरच्या काळात अपप्रचार करण्यात आला की, “गांधी हे नेहमी मुस्लिमांचे लांगुलचालन करायचे ; गांधीजींनी पाकिस्तानची निर्मिती केली; गांधीजींनी 55 कोटी रूपये पाकिस्तानला दिले”. यातील एकही वाक्य सत्यावर आधारित नाही. जर 1935, 1942 आणि स्वातंत्र्याच्या आधी त्यांच्यावर जे हल्ले करण्यात आले होते ते का आणि कशासाठी केले होते? गांधीजींनी असा कोणता गुन्हा केला होता की ज्यांच्यावर 1935, 1942 साली हल्ला करण्यात आला होता. पाकची निर्मिती, 55 कोटी रूपये, मुस्लीम ही सर्व नंतर गांधीजींना बदनाम करण्यासाठी वापरलेली साधने होती.

या सगळ्याचा विचार केल्यानंतर एक गोष्ट माझ्या मनात येते ती अशी की, जातपात आणि वर्णव्यवस्थेच्या विरोधातील लढ्याचे नेतृत्व करणारे महात्मा गांधी हे पहिले बहुजनवादी नेते होते. त्या आधीचा इतिहास तपासाल तर येथील नेतृत्व आणि जनआंदोलन हे काँग्रेसमधील उच्चवर्णीयांच्या हातात एकवटले होते. त्यामुळेच येथील उच्चवर्णीयांच्या मनात असलेली खदखद महात्मा गांधींच्या हत्येमध्ये रुपांतरीत झाली. या कटात कोण सहभागी होते, याबद्दल मला काही लिहायचे नाही. पण, नथुरामने मुंबईत शेवटची भेट कोणाची घेतली, हे सर्वश्रुत आहे. नथुराम गोडसेला “यशस्वी भव” हा आशीर्वाद कशासाठी दिला होता. म्हणूनच गांधीजींची हत्या कशासाठी करण्यात आली, असे मला कोणी विचारले तर मी स्पष्टपणे नमूद करेन की, “गांधीजींची हत्या दुसर्‍या कशासाठी नाही तर गांधीजींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व समाजासाठी दरवाजे उघडले… सर्व समाज नेतृत्व करायला मोकळा झाला. त्यातूनच उच्चवर्णीयांच्या मनातील खदखद नथूरामच्या पिस्तूलातून बाहेर पडली. म्हणूनच मी म्हणतो की या देशातील पहिला अतिरेकी नथुराम गोडसे हाच होता.” पण, हेही तेवढेच सत्य आहे की गांधीजींना कितीही गोळ्या मारल्या तरी गांधी कधीच मरणार नाहीत. आजही भारतामध्ये त्यांच्याबाबत पसरविला जाणारा तिरस्कार वाढतच चाललाय. इतिहासाचा अभ्यास न करता दोष देण्याचे काम आपण सहज करतो , सध्या वाॅटसॲप युनिव्हर्सिटीच्या काळात हा द्वेष अधिकच पसरत जातो. आज मी जे लिहिले आहे, त्याचा मी अनेक वर्ष विचार करीत होतो. पण, कधीच लिहिण्याची हिमंत मी दाखविली नव्हती. पण, आज मात्र स्पष्टपणे लिहितो की, गांधीजींची हत्या ही इतर कोणत्याही कारणाने झाली नाही तर ती फक्त जातवर्चस्वातूनच झाली.

#गांधी_हम_शर्मिंदा_है#आपके_कातिल_जिंदा_है!


शेअर करा