अज्ञात व्यक्तींनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार अन संग्राम जगताप यांच्या फोटोवर गुटखा खाऊन मारल्या पिचकाऱ्या 

शेअर करा

नगर शहरात कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप यांचे फलक लावण्यात आलेले होते. छत्रपती संभाजीनगर रोडवरील महापालिका कार्यालयासमोरच्या रस्त्यावर हे फलक लावण्यात आले असून अनेक फलकांवर गुटका आणि मावा खाऊन थुंकण्याचा प्रकार समोर आला आहे . आरोपी व्यक्तींवर कारवाईची मागणी तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. 

अहिल्यानगर महापालिका कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर रोडवरील डिवायडरवर हे फलक लावण्यात आलेले होते. रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेल्या या फलकांना परवानगी कुणी दिली ? हा प्रश्न तपासाचा भाग असला तरी 30 जानेवारीच्या रात्री काही फलक फाडल्याचे तसेच काही फलकांवर गुटखा मावा खाऊन थुंकण्याचा प्रकार समोर आलेला आहे. एक तारखेला सकाळपर्यंत देखील काही फलक अशाच स्वरूपात आज झळकत होते. 

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने काही फलक याआधीच काढून घेतले असले तरी उर्वरित फलकांवर आज एक तारखेला पुन्हा मावा खाऊन थुंकल्याचे समोर आले आहे. नगर चौफेर प्रतिनिधीने पाहणी केली त्यावेळी एक तारखेला सकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार आणि आमदार संग्राम जगताप यांच्या फलकांवर गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसून आलेल्या आहेत . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फ्लेक्सवर मात्र एक तारखेला सकाळी कुठलीही पिचकारी मारलेली आढळून आली नाही. 

तिन्ही पक्षांच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात संताप व्यक्त केलेला असून अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्याची गरज आहे असे म्हटलेले आहे. सदर फलक लावण्यास परवानगी कोणी दिली हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. विनापरवाना असे फलक लावणाऱ्यांवर कुठली कारवाई होईल याचीही आता नगरकरांना आशा राहिलेली नाही . 


शेअर करा