दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले असून तब्बल 41 जागा भाजपने जिंकलेल्या असून 48 जागांवर भाजप आघाडीवर आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीनदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले अरविंद केजरीवाल हे ४०८९ मतांनी भाजपचे नेते प्रवेश वर्मा यांच्याकडून पराभूत झालेले आहेत. दिल्लीमधील विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते.
दिल्लीमध्ये सत्ताधारी आप, मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा यांच्यात मुख्य लढत होती. काँग्रेसने दिल्लीत विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवलेली होती मात्र काँग्रेसला आतापर्यंत एकाही ठिकाणी यश मिळालेले नाही. २०१५ पासून दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा पराभव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ,’ हा विकास आणि सुशासनाचा विजय ‘ असल्याचे म्हटले आहे.
“राजकारणात शॉर्टकट आणि लबाडीला स्थान नाही. जनतेने शॉर्टकटचे राजकारण करणाऱ्यांना शॉर्टकट दाखवला. लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने मला कधीही निराश केले नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तिन्ही निवडणुकांमध्ये दिल्लीच्या जनतेने भाजपला सात जागांवर विजय मिळवून दिला. दिल्लीची सेवा करू न शकल्याची वेदना माझ्या मनात होती. पण आज दिल्लीनेही माझी विनंती ऐकली. २१व्या शतकात जन्मलेल्या पिढीला पहिल्यांदाच दिल्लीत भाजपचे सुशासन दिसेल. भाजपच्या सुशासनावर देशाचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आम्ही पहिल्यांदा हरियाणात अभूतपूर्व विक्रम केला. त्यानंतर महाराष्ट्रात नवा विक्रम झाला. आता दिल्लीत नवा इतिहास रचला आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात त्यांनी भाजपला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मी भाजपाला विजयाच्या शुभेच्छा देतो. मी अशी अपेक्षा करतो की दिल्लीच्या जनतेने भाजपला ज्या गोष्टींसाठी मतं दिली आहेत, ती विधायक कामे भविष्यात भाजपकडून नीट पार पाडली जातील. गेल्या १० वर्षात आमच्या पक्षाने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहून दिल्लीचा विकास केला. दिल्लीकरांना सर्व सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहिला. दिल्लीतील पायाभूत सुविधा सुधारण्यावरही आम्ही काम केले. आता आम्ही विरोधीपक्षाची भूमिकाही चोख पार पाडू. दिल्लीकरांच्या सुख-दु:खात आम्ही नक्कीच त्यांच्या सोबत असू. आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठीच आलो आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी घेतलेल्या कष्टासाठी त्यांचे आभार…