रेखा जरे खून प्रकरण : अखेर बाळ बोठे याच्या जामिनावर निकाल आला : वाचा पूर्ण बातमी

शेअर करा

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळला असल्याने बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेखा जरे खून प्रकरणात नाव आल्यापासून फरार असलेल्या बोठे याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी हा अर्ज दाखल केला होता.त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने त्याचा जामीन फेटाळून लावला आहे. आरोपीतर्फे ऍड. महेश तवले यांनी युक्तिवाद केला होता तसेच या प्रकरणात द्वेषातून बोठे याचे नाव गोवल्याचा आरोप त्यांनी केला होता.

सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ऍड. सतीश पाटील यांनी बाजू मांडताना या प्रकरणात बोठे याच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि लेखी पुराव्यांचा समावेश असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते. यावर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. आज तो सुनावण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी बोठे याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ ज बोठे पसार आहे. बोठे याच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. जरे यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हे बोठेच्या चौकशीतूनच समोर येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलीस आरोपी बोठे याचा कसून शोध घेत आहे.

बाळ बोठे याचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली असली तरी अद्यापतरी पोलिसांचा तपास हा ‘सुपारी’ पलीकडे सरकलेला दिसत नाही आणि बाळ बोठे याला पकडण्यास अद्यापदेखील यश आले नाही. नाशिक इथे बाळ बोठे पोलिसांच्या ताब्यात येणार होताच मात्र अचानकपणे तो पोलिसांच्या तावडीतून निसटला त्यामुळे बोठे याचे खबरी कोण आणि ते कोणासाठी काम करतात, याचाही शोध घेणे गरजेचे झाले आहे . बोठे याची पोलीस कोठडीत रवानगी केल्यास अनेक सत्य उघडकीस येऊ शकतील त्यामुळे बोठे यास अटक होणे अत्यंत गरजेचे असून यानंतरच सर्व काही चित्र स्पष्ट होण्याची आशा नगरकरांना लागून राहिलेली आहे.

टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, बाळ बोठे याने काही दिवसापूर्वी नगर इथे हनी ट्रॅपचे रॅकेट कसे कार्यरत आहे याबदल एक मालिका छापली होती. त्या मालिकेत कसे धनदांडगे सावज हेरून जाळ्यात ओढले जाते आणि नंतर माहितीतील पोलिसांची मदत घेत धाड घालून कशा पद्धतीने ‘ मांडवली ‘ केली जाते याचा लेखाजोखा देखील दिला होता, अर्थात ही माहिती बोठे यांच्यापर्यंत कशी पोहचत होती हे मात्र गूढ आहे.

नगर शहरात असलेल्या या कथित हनी ट्रॅपमध्ये कोण कोण सहभागी आहेत याचाच पोलीस सध्या शोध घेत आहेत तसेच रेखा जरे यांच्या खुनाशी देखील हनी ट्रॅप निगडित आहे का ? अशा अँगलचा देखील शोध सुरु आहे . नाजूक विषय असल्याने कोणी पुढे येऊन पोलिसांना मदत करण्यास धजावत नाही तसेच ‘ झाकली मूठ सव्वा लाखाची ‘ अशा रीतीने मोठी धेंडे देखील बदनामीपोटी गप्प आहेत.

“आरोपीचा शोध घेण्यासाठीही पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक होईल, असा आम्हाला विश्वास आहे. मी नागरिकांनाही आवाहन करतो की आरोपीविषयी कुणाला कोणतीही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याविषयी पूर्ण गोपनीयता पाळली जाईल,” असंही मनोज पाटील यांनी नमूद केलं.

काय आहे प्रकरण ?

रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली होती . हल्लेखोर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

रेखा जरे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे जरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बोठे देखील हजर होता तेव्हापासूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. दरम्यान याच गुन्ह्यातील इतर आरोपीना अटक होताच बोठे फरार झाला आणि अद्यापदेखील पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून लवकरात लवकर बोठे यास अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.


शेअर करा