नगर जिल्ह्यातील हायवेवरील धाबे हे अवैध व्यवसायाचे केंद्र बनलेले दिसून येत असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर तालुक्यातील रुईछत्तीशी इथे कारवाई करत देहविक्री व्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश केलेला आहे. तब्बल 11 महिलांची या ठिकाणावरून सुटका करण्यात आलेली असून पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , रुईछत्तीशी इथे साई लॉजिंग इथे हा प्रकार सुरू होता. गणेश संपत गोरे ( राहणार रुईछत्तीशी ) , मनोज आसाराम गावडे ( राहणार धानोरा तालुका आष्टी जिल्हा बीड ) तसेच इतर तीन जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
रुईछत्तीसी येथील साई लॉजिंगमध्ये बनावट ग्राहक म्हणून पोलीस अंमलदार यांना पाठवण्यात आले होते त्यानंतर खात्री पटल्यानंतर छापा टाकून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या 11 महिलांनी आरोपी हे आमच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती दिलेली असून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात आता गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.