स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणीला पोलिस निरीक्षकाने दिली ‘ लिफ्ट ‘ आणि ..

शेअर करा

स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. कोर्टाने जामीन फेटाळताच संशयित हसबनीस गुरुवारी कडेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याच्या भूलथापा देत त्याने मे २०२० मध्ये तरुणीला घरी बोलवले आणि तिच्यावर बलात्कार केला होता. सांगली जिल्ह्यातील बातमी असून हसबनीस याच्या काळकृत्याने वर्दी कलंकित झाली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस जून २०१८ मध्ये कडेगाव पोलीस ठाण्यात बदली होऊन रूजू झाले असताना लॉकडाउनच्या काळात मे महिन्यात कारने कोल्हापुरातून कराडच्या दिशेने जाताना त्याला कासेगाव बसस्थानकाजवळ वाहनाच्या प्रतीक्षेत थांबलेली तरुणी दिसली. हसबनीस याने तरुणीला कराडपर्यंत लिफ्ट दिली आणि प्रवासादरम्यान तिचा मोबाइल नंबर घेतला. ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असल्याने तिला अभ्यासात मदत करण्याच्या भूलथापा दिल्या. त्यानंतर वारंवार फोन करून कडेगाव येथील त्याच्या घरी बोलावू लागला .

घरी आल्यानंतर हसबनीस याने वारंवार बलात्कार केल्याची फिर्याद पीडित तरुणीने कडेगाव पोलीस ठाण्यात केली आहे . हा प्रकार एप्रिल ते जुलै दरम्यान घडला. याबाबत कोणाला सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास मी आत्महत्या करेन, अशी धमकीही हसबनीस याने पीडितेला दिली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून तत्कालीन पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांनी संशयित हसबनीस याला निलंबित केले.

जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर हसबनीस याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीत हसबनीस याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. जामीन अर्ज फेटाळताच तो गुरुवारी सकाळी कडेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. इस्लामपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.


शेअर करा