राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने अत्याचाराचा प्रतिबंध करण्यासाठी महिलांना एक खून करण्याची परवानगी द्या अशी मागणी राष्ट्रपतींकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे.
रोहिणीताई खडसे यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की ,’ राष्ट्रपती महोदया.. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आपला देश हा महात्मा गांधी गौतम बुद्धांचा देश म्हणून ओळखला जातो. आपला देश शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून मी खालील प्रमाणे मागणी करत आहे.
आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत . येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. विचार करा काय परिस्थिती असेल ? जागतिक लोकसंख्या आढावा पाहणी अहवालानुसार आशिया खंडात भारत हा महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेलेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही यात समावेश असून आम्हाला एक खून माफ करा अशी समस्त महिलांची मागणी आहे ,’ असे त्यांनी म्हटलेले आहे