बीड जिल्ह्यात वाल्मीक कराड पाठोपाठ आता दुसरा एक कुख्यात गुंड चर्चेत आलेला असून विशेष बाब म्हणजे हा गुंड भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या जवळचा आहे. एका व्यक्तीला केलेली मारहाण आणि नोटांचे बंडल उधळणारा हा व्यक्ती , सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर शनिवारी वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी वन्यजीवांची शिकार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य पंचनामा करून जप्त करण्यात आले.
सतीश भोसले हा झापेवाडी शिवारात राहत असून त्याने बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ नावाच्या व्यक्तीला अमानुष मारहाण केलेली होती. बावी येथील ढाकणे पिता पुत्राला देखील त्याने हरणाची शिकार करू दिली नाही म्हणून मारहाण केलेली होती दोन्ही घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडालेली असून आता ढाकणे पिता पुत्रांकडून देखील त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या कारवाईला वेग आलेला असला तरी सतीश भोसले गुन्हा दाखल होताच फरार झालेला आहे. त्याच्या घराची झडती घेतली त्यावेळी तिथे प्राण्यांचे वाळलेले मांस, वन्यजीव पकडण्यासाठी वापरले जाणारे हत्यारे सोबतच दोन पिंजरे , एक सत्तूर आणि तितर पकडण्यासाठी लागणारे फासे याच्यासोबत गांजाचे पाकीट देखील आढळून आलेले आहे. सुरेश धस यांच्यासोबत त्याचे संभाषण चांगलेच व्हायरल झालेले असून सुरेश धस त्यामुळे अडचणीत आलेले आहेत.