संपूर्ण नगर जिल्ह्यात अवसायनात निघालेल्या बँका पतसंस्था तसेच शेअर मार्केट घोटाळे आणि सायबर घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर आलेले असून आत्तापर्यंत बहुतांश गुन्ह्यांमध्ये नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळालेले नसून कासवाच्या गतीने तपास सुरू आहे आणि ठेविदारांच्या नशिबी केवळ पोलीस ठाण्याचे हेलपाटे मारणे आलेले आहे.
काही दिवसांपूर्वी नगर शहरात क्लासिक ब्रिजमणी सोल्युशन आणि मनी मॅक्स नावाचा घोटाळा समोर आला त्याप्रकरणी कंपनीचा मालक संदीप सुधाकर थोरात याच्यासोबत त्याच्या सहकाऱ्याला अटकही झाली मात्र तरीही तपासात आवश्यक अशी गती दिसून येत नाही.
नगर जिल्ह्यात यापूर्वी देखील नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा , ध्येय मल्टीस्टेट , महालक्ष्मी यासारख्या अनेक आर्थिक संस्थांनी ठेवीदारांना गंडा घातला. संस्थांची फसवणूक करण्याची पद्धत ही वेगवेगळी असल्याने अनेक गुंतवणूकदार त्यांच्या जाळ्यात फसतात. सायबर घोटाळ्याची देखील अशीच परिस्थिती आहे.
कधी ओटीपी मागून तर कधी मोबाईल हॅक करून तर कधी डिजिटल अरेस्टची भीती दाखवत पैसे उकळण्यात सायबर गुन्हेगार आता पटाईत झालेले आहेत. पतसंस्था पाठोपाठ आता शेअर मार्केटमध्ये सावज शोधण्यासाठी टेलिग्राम आणि व्हाट्सअपचा देखील वापर सुरू झालेला आहे . नगरमध्ये एका प्रकरणात परदेशात चीन आणि कंबोडियामध्ये देखील शेअर मार्केटचे धागेद्वारे असल्याचे तपासात समोर आलेले होते.