नवा करोना विषाणू : ‘ अशी ‘ आहे केंद्राने जाहीर केलेली नवीन नियमावली

शेअर करा

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या करोना विषाणूच्या रुपानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून नव्या नियमानुसार, यूकेहून येणाऱ्या प्रवाशांपैंकी नव्या करोना स्ट्रेनसहीत संक्रमित आढळलेल्या रुग्णांना वेगळ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. करोना संक्रमित आढळलेल्या सह-प्रवाशांना इन्स्टिट्युशनल क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येईल. सरकारनं करोनाचा वाढता धोका लक्षात घेता ब्रिटनहून येणाऱ्या विमानांसाठी नवे एसओपी जाहीर केली आहे, ती खालीलप्रमाणे

काय आहेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे नवीन निर्देश ?

  • ब्रिटनहून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावरच आरटी-पीसीआर चाचणी करणं अनिवार्य आहे. या टेस्टमध्ये करोना संक्रमित आढळलेल्या रुग्णांना एका वेगळ्या आयसोलेशन युनिटमध्ये इन्स्टिट्युशन क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येईल. पॉझिटिव्ह आढलेल्या रुग्णांचे नमुने ‘जिनोमिक सिक्वेंसींग’साठी पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ला पाठविण्यात येतील.
  • करोना संक्रमित आढळलेल्या व्यक्तीमध्ये नवा विषाणू न आढळळ्यास त्याच्यावर सध्याच्या सुरू असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करण्यात येतील. परंतु, ‘जिनोमिक सीक्वेन्सिंग’मध्ये नवा विषाणू आढळल्यास त्या रुग्णावर उपचार सध्याच्या प्रोटोकॉलनुसार झाल्यानंतर १४ दिवसानंतर पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येईल. १४ व्या दिवशीही तो पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्या चाचण्या तोपर्यंत सुरू राहतील जेव्हापर्यंत सलग दोन वेळा त्याच्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह येणार नाही.
  • आरटी-पीसीआर चाचणीत निगेटिव्ह आढळणाऱ्या प्रवाशांना घरी क्वारंटीन राहण्याचा सल्ला दिला जाईल. चेक इन करण्यापूर्वीच या सगळ्या गाईडलाईन्स प्रवाशांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी विमान कंपनीची असेल. उड्डाणादरम्यान याची अनाउन्समेंट केली जाईल. आगमन-प्रतीक्षा भागात ही मार्गदर्शक तत्त्वे चिकटवली जातील.
  • २१ ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनहून येणाऱ्या आणि आरटी-पीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना एका वेगळ्या क्वारंटीन सेंटरमध्ये इन्स्टीट्युशनल क्वारंटीन केलं जावं. तसंच आयसीएमआर मार्गदर्शक सूचनांनुसार तपासणी केली जावी.
  • अशावेळी संक्रमित व्यक्तीच्या सीटलाईनमधल्या तीन सीट पुढे आणि तीन सीट मागे ज्या व्यक्ती बसलेल्या असतील त्यांना ‘संपर्कात आलेल्या व्यक्ती’ म्हणून गणलं जाईल. तसंच यात प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या केबिन क्रूची देखील ओळख पटवली जाईल.
  • २१ ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनहून आलेल्या आणि आरटी-पीसीआर चाचणीत निगेटिव्ह आढळलेल्या प्रवाशांची यादी राज्यांना सोपवली जाईल. त्यांना होम क्वारंटीन करण्यात येईल.
  • २५ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान जे प्रवासी ब्रिटनमधून येतील त्यांच्याशी डिस्ट्रिक्ट सर्व्हिलान्स अधिकारी संपर्क करतील तसंच अशा प्रवाशांना स्वत:च्या तब्येतीवर लक्ष ठेवावं लागेल. कोणतीही लक्षणं आढळल्यास या प्रवाशांची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल. चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास नवा कोविड विषाणूच्या तपासासाठी नमुन्यांची चाचणी केली जाईल.
  • ९ डिसेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीची यादी डिस्ट्रिक्ट सर्व्हिलान्स अधिकाऱ्यांकडे सोपवली जाईल. पुढचे १४ दिवस ते या लोकांचा फॉलोअप घेतील.
  • पर्यवेक्षणाखाली असणार्‍या प्रवाशांच्या भारतातील एन्ट्रीच्या २८ दिवसांपर्यंत अधिकारी त्यांची माहिती घेत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवतील.
  • ९ डिसेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान यूकेमधून आलेल्या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल. विमानतळावर चाचणी निगेटिव्ह आली असेल किंवा त्याने आपल्यासोबत निगेटिव्ह चाचणी रिपोर्ट आणला असेल तरीही चाचणी करावी लागेल.
  • प्रवासी ज्या शहरात विमानाने उतरले त्या शहरातून दुसऱ्या शहरात गेले असतील तर त्याची माहिती संबंधित जिल्हा आणि राज्यांना दिली जाईल.
  • अशा प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना स्वतंत्र आयसोलेशन सेंटरमध्ये इन्स्टिट्युशनल क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येईल.
  • एखाद्या प्रवाशाबद्दल माहिती मिळाली नाही तर डिस्ट्रिक्ट सर्व्हिलान्स अधिकारी सेंट्रल सर्व्हिलान्स युनिटला याबद्दल माहिती देतील.

शेअर करा