अहिल्यानगर महापालिका हददीत सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू असली तरी नागरिकांना जबाबदारीचे कुठलेही भान दिसून येत नाही. असाच एक प्रकार तोफखाना परिसरातील भराड गल्ली इथे समोर आलेला होता. नव्याने काम झालेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता एका व्यक्तीने विनापरवाना खोदून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले प्रकरणी दोन जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अशोक ओसवाल आणि विलास निर्मल ( दोघेही राहणार भराड गल्ली चितळे रोड अहिल्यानगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे असून सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता फोडण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना मिळाली होती त्यानंतर डांगे यांनी प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांना त्या ठिकाणी पाठवले त्यावेळी हा रस्ता फोडलेला असल्याचे समोर दिसून आले. कुठलेही समाधानकारक उत्तर रस्ता फोडणाऱ्या व्यक्तींकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाले नाही त्यानंतर तोफखाना पोलिसात याविषयी फिर्याद देण्यात आली.
नगर शहरात आणि उपनगरात सर्रासपणे महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता रस्ता फोडून कामे करण्यात येतात मात्र त्यानंतर रस्ता व्यवस्थित बुजवण्यासाठी मात्र कुठलाही खर्च केला जात नाही. किरकोळ खडी टाकून किंवा उकरलेली माती टाकूनच खड्डा बुजवण्यात येतो आणि त्यानंतर पुन्हा रस्त्याची दुर्दशा होते त्यामुळे संपूर्ण शहरात अशा स्वरूपाचे हजारो खड्डे निर्माण झालेले आहेत.