छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापले असून बजरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे. पुण्यातील धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनी ही कबर नष्ट करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर सरकारने औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे सोबतच मिलिंद एकबोटे यांना 5 एप्रिलपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येण्यास बंदी करण्यात आली आहे.
औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देते. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी. अन्यथा, बजरंग दल स्वभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, असा इशारा बजरंग दलाने दिला असून औरंगजेब याची कबर हटवली नाही तर पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचे बजरंग दलाने म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका घेत ,’ 27 वर्ष औरंगजेबाला येथे राहूनही राज्य करता आले नाही. त्याच प्रतीक म्हणून औरंगजेबाची कबर आहे. ही कबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील. त्यामुळे एक प्रतीक म्हणून त्या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे. विश्व हिंदू परीषद आणि बजरंग दल यांनी स्टंटबाजी करू नये. औरंगजेब जेवढा क्रूर होता तेवढ्याच क्रूरपणे महाराष्ट्रातल फडणवीस सरकार वागत आहे. घाशीराम कोतवाल प्रमाणे गृहविभाग चालवले जात आहे. औरंगजेबाची कबर म्हणजे विरत्वाची कबर नाही तर ती कबर क्रूर पणाची आहे. त्यामुळे ती कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देखील आहे.