छात्र भारतीचे विद्यार्थी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष अनिकेत दादा घुले यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला होता. सदर मोर्चाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यादेखील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या होत्या. सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात निवेदन देण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती.
उत्कर्षा रूपवते यांनी या विषयावर बोलताना, ’ राज्यभरात ठिक-ठिकाणी वाढत असलेल्या हिंसाचाराच्या घटना, लोकशाही पद्धतीने न्याय मागत असताना होणारी मुस्कटदाबी, नेत्यांची – मंत्र्यांची बेभान वक्तव्य, समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न या सगळ्या विरोधात जनमानसात प्रचंड चीड असून याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला होता ,’ असे म्हटलेले आहे.
DYSP सोनवणे यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी यासाठी मोर्चातील व्यक्तींकडून मागणी करण्यात आली. निषेध सभेसाठी आ. कपिल पाटील, आ. डॉ. सुधीर तांबे, सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव डॉ.अजित नवले, सेवा दलाचे राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ कांदळकर, छात्र भारतीचे राज्याचे अध्यक्ष रोहित ढाले, राजाभाऊ अवसक, एड. रंजनाताई गवांदे, सिताराम राऊत, डॉ. सागर भालेराव, दत्ता ढगे, रजत अवसक व विद्यार्थी सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.