गेल्या तेवीस दिवसांपासून नगर शहरातुन बेपत्ता झालेले चितळेरोड येथील व्यावसायिक दीपक परदेशी यांचा अखेर मृतदेह निंबळक बायपासजवळ एका नाल्यात आढळून आलेला आहे. खंडणीच्या कारणावरून आरोपींनी हे कृत्य केलेले असून त्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नगर शहरातील चितळेरोड येथील दीपक ऑइल डेपोचे मालक दीपक लालसिंग परदेशी ( वय 68 राहणार बोल्हेगाव मराठी शाळेजवळ ) हे 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता झालेले होते. आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत परदेशी कुटुंबीयांनी माहितीसाठी नागरिकांना आवाहनही केलेले होते.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे सागर गिताराम मोरे (रा. ब्राह्मणी) आणि किरण बबन कोळपे (रा. विळद, ता. अहिल्यानगर) अशी असून तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल गायधनी यांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे या दोघांना राहुरी परिसरातून अटक केली.
दीपक परदेशी यांनी विळद येथील काही लोकांना उसने दिलेले पैसे अडकले होते आणि या पैशांवरून वाद सुरू होता. संशयितांनी परदेशी यांच्याकडे थेट १० कोटी रुपयांची मागणी केली आणि हे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी अपहरणाचा कट रचला . परदेशी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संशयितांनी त्यांचा गळा आवळून खून केला असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
आरोपींची मृतदेह लपवण्यासाठी त्यांनी तो निंबळक बायपासजवळील नाल्यात फेकून दिला. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला. दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. नगर शहरासह जिल्ह्यात रोज नवनवीन खुनाच्या घटना समोर येत असून नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा आहे.