गुलमोहर रोडवरील ‘ त्या ‘ वृक्षतोड प्रकरणात बिल्डरवर गुन्हा दाखल ,  मनमानी पद्धतीने वृक्षतोड करणं अंगलट

शेअर करा

नगर शहरात अनेक ठिकाणी नागरिकांकडून कुठलीही परवानगी न घेता वृक्ष तोडण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार शहरातील गुलमोहर रोड परिसरात समोर आलेला होता. गृहसंजीवनी कन्स्ट्रक्शन इंजिनिअर आणि डेव्हलपर यांच्या प्रोजेक्टसमोर काही झाडे विनापरवाना तोडण्यात आली असल्याने महापालिकेच्या वतीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजान , उद्यान विभाग कर्मचारी गणेश दाणे , विजय कुलाळ यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि तोफखाना पोलीस ठाण्यात याविषयी फिर्याद दिली. वृक्षतोड करणाऱ्या कामगारांनी देखील परवानगी घेतली आहे की नाही ? याची खात्री करूनच वृक्ष तोडावेत अन्यथा अशा कामगारांवर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असे महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले आहे. 

महाराष्ट्र नागरी क्षेत्रातील वृक्षांचे संवर्धन व जतन अधिनियम 1975 चे आठ व 21 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सुमारे आठ ते दहा वर्षे वय असलेल्या झाडांची तोड बेकायदेशीररित्या करण्यात आलेली होती. नगर शहरात मुळातच झाडांचे प्रमाण कमी असून नागरिकांमध्ये देखील विनापरवाना झाडे तोडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आगामी काळात महापालिका प्रशासन विनापरवाना  वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करेल असा इशारा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलेला आहे.


शेअर करा