रेखा जरे हत्याकांड : पोलीस तपास ‘ सुपारी ‘ वरच अडलेला तर बोठेच्या संपत्तीची चौकशी करण्याची कोणी केली मागणी ?

शेअर करा

नगर: रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसल्याने पोलिसांनी आता त्याच्याशी संबंधित आणि कार्यालयीन सहकाऱ्यांकडेही चौकशी सुरू केली आहे. बोठे याच्याकडील परवाना असलेले शस्त्र पोलिसांनी पूर्वीच जप्त केले असून, आता त्याचा शस्त्र परवाना कायम स्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे दरम्यान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्याच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठीही वेळ पडली तर तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. बोठे याचा आयफोन उघडण्यात यश आल्यास अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे .

बाळ ज बोठे याच्या वतीने अटकपूर्व जामीन अर्ज करण्यात आला होता. मात्र, सत्र न्यायालयाने तो फेटाळला आहे त्यावर अद्याप तरी उच्च न्यायालयात अपील करण्यात आलेले नाही. न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नसल्याने पोलिसांकडून बोठेचा शोध सुरूच असला तरी पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नाहीत. नाशिक इथे पोलिसांच्या हाती बोठे जवळजवळ आलाच होता मात्र अचानक तो सटकला आता पोलिसांची पथके या कामासाठी कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी, तपासात काहीच प्रगती होताना दिसत नाही. अद्याप बोठे सापडलेला नसल्याने तपास फक्त ‘ सुपारी’ वरच अडकलेला आहे आणि आयफोनचे लॉक उघडत नसल्याने पोलीस देखील हतबल आहेत.

बाळ ज. बोठेचा आयफोन जप्त करण्यात आलेला असला तरी त्याचे लॉक उघडत नाही. त्यामुळे यासाठी मुंबईतील पोलिसांच्या प्रयोगशाळेतील तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार सुरू आहे मात्र सदर प्रक्रियेतील वेग मंदावलेला दिसत आहे. बोठे गेल्या २२ दिवसांपासून फरार आहे. काही माहिती मिळते का, यासाठी पोलिसांनी त्याचे निकटवर्तीय आणि सहकाऱ्यांकडेही चौकशी सुरू केली आहे. गुन्हा घडला त्यावेळी आणि त्याआधी संपर्कात असलेल्या लोकांकडे चौकशी करण्यात येत असली तरी त्यातून अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही.

रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बोठे याच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी येथील ज्येष्ठ वकील तथा माजी अतिरित्त सरकारी वकील सुरेश लगड यांनी केली आहे. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात लगड यांनी म्हटले आहे की, बोठे याने काही महिन्यांपूर्वी प्रकाशित केलेल्या वृत्तमालिकेची चौकशी करण्यात यावी. ही मालिका कशाच्या अधारे प्रकाशित केली, त्यातून काय साध्य होणार होते, याची चौकशी केली जावी. बोठे याला न्यायालयाकडून फरार घोषित करून संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली जावी. तसेच अटकपूर्व जामिनासाठी त्याच्याकडून उच्च न्यायालयात प्रयत्न केले जाऊ शकतात, तेथेही पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

काय होती बोठे याने प्रकाशित केलेली वृत्तमालिका ?

विविध क्षेत्रांतील ‘वजनदार’ आणि धनिकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या ‘हनी ट्रॅप’ची नगरमध्ये लावलेली ‘ज्योत’ चांगलीच ‘तेवत’ आहे. मात्र, तिच्या विखारी तेजामुळे अनेकांचे कौटुंबिक वातावरण काळवंडत आहे. नगर जिल्हा पादाक्रांत केल्यानंतर या ‘ज्योती’ने आपले ‘अनोखे रुप’ दाखवत औरंगाबाद, नाशिक, सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील ‘बाजारपेठ’ही काबीज केली. आता तर ‘ज्योती’चा जलवा थेट पुण्या-मुंबईपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे मंत्रालयाच्या केवळ दारात न स्थिरावता तेथील काही मजले ‘ज्योती’ने आपल्या कवेत घेतले आहेत.

या सगळ्या लेखात एक नाव प्रकर्षानं येते, ते नाव म्हणजे सागर भिंगारदिवे… रेखा जरे हत्याकांडातील एका आरोपीचं नावही सागर भिंगारदिवेच आहे. मात्र, या लेखात तो सागर भिंगारदिवे हे नाव अप्रत्यक्षरित्या घेत, त्याला या सगळ्यातील एजंट म्हणतो…सागर भिंगारदिवे हा नगरजवळीलच केडगावचा राहणारा आहे आणि रेखा जरे हत्याकांडात तो आरोपी आहे.

भिंगारदिवेंच काम काय?

टोळीच्या या म्होरक्‍यांपैकी एकाने ‘भिंगार’चे ‘दिवे’ पाजळत ‘सागर’तळ ढवळला. या म्होरक्‍याचेही अनेक उद्योग आहेत. हनी ट्रॅपसाठी ‘बकरा’ शोधणे, त्यांच्या ‘कार्यक्रमा’ची वेळ आणि ठिकाण ठरवणे, बकरा पटवण्यासाठी संबंधित महिलांना अश्‍लील व्हिडिओ उपलब्ध करुन देणे, संभाषणाच्या ‘ट्रिक’ सांगणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ‘सागर’तळ ढवळत पार पाडल्या जातात. या हत्याकांडाचा शोध लावताना पोलिसांनी बाळ बोठेने लिहिलेले लेखही वाचणं गरजेचं आहे, कारण यात अनेक पुरावे असण्याची शक्यता दाट आहे.

नगरमधील ‘देव’माणूस

नगरमध्ये हनी ट्रॅप… पोलिस अधिकारी, व्यापारी, धनिकही प्रेम”जाळ्या”त… अशा हेडलाईनखाली त्याने हा लेख छापला. या लेखात त्यानं नाव न घेता एका प्रतिष्ठित व्यक्तीचा उल्लेख केला.

नगरमधील एक ‘देव’माणूस ‘ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्या टोळीच्या कचाट्यात ‘दत्त’ म्हणून सापडला. टोळीच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘मामी’च्या मोहजालात शिरकाव केल्यानंतर या ‘देवा’ला नगर शहराजवळील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. तेथे ‘योग्य’ वेळ येताच ‘मामी’च्या सांकेतिक इशाऱ्यानुसार ‘टीम ब्लॅकमेलर’ हजर झाली. ‘देव’माणसाची प्रारंभी धुलाई करुन त्याच्यावर दहशत निर्माण करण्यात आली. ‘त्या’ घटनेचे लाइव्ह रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानंतर ‘देव’माणसाचा कबुलीजबाब वजा व्हिडीओ तयार करण्यात आला. त्याच्या गळ्यातील सुमारे तीन लाखांची सोनसाखळी आणि रोख रक्कम तर घेतलीच; शिवाय ‘ऑन द स्पॉट’ त्याच्याकडून पाच लाखांची अतिरिक्त वसुलीही करण्यात आली.

या लेखातून बाळ बोठेने हनी ट्रॅपचा धंदा कसा फोफावत आहे, आणि त्याला समाजातील बडे अधिकारी, राजकारणी कसे बळी पडलेत याची पोलखोल केली. या पोलखोलीनंतर या टोळ्यांकडून पत्रकारांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही तो यात म्हणतोय.

मुंबईतील ‘डॅडी’-‘मम्मी’चीही मदत

लेखांची मालिका सुरु केल्यानंतर विविध क्षेत्रांतील महिलांना किंवा भाडोत्री महिलांना पुढे करुन विनयभंग, बलात्काराचे गुन्हे नोंदवण्याची व्यर्थ धडपड टोळीने चालवल्याचे समजते. हे नाही जमले तरी किमान म्होरक्‍या अथवा त्याच्या समर्थकांमार्फत “अॅट्रॉसिटी’चा गुन्हा अथवा अपघात घडवून आणण्याचा पर्याय निवडायचा, असेही दिसत आहे. गरज पडल्यास मुंबईतील ‘डॅडी’ अथवा ‘मम्मी’चीही मदत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

बाळ बोठेला ही माहिती कुठून मिळत होती, त्याचा खबऱ्या कोण होता? हनी ट्रॅपच्या प्रकरणाची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत आणि त्यात कुणाकुणाचा हात आहे? हे तपासणं आता जास्त गरजेचं आहे. त्यासाठी बाळ बोठेने सुरु केलेली ही मालिका बारकाईने वाचणं, आणि त्यातील संबंधित व्यक्तींपर्यंत पोहचून तपास करणं जास्त गरजेचं आहे. कदाचित यातून आणखी मोठं सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.

“आरोपीचा शोध घेण्यासाठीही पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक होईल, असा आम्हाला विश्वास आहे. मी नागरिकांनाही आवाहन करतो की आरोपीविषयी कुणाला कोणतीही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याविषयी पूर्ण गोपनीयता पाळली जाईल,” असंही मनोज पाटील यांनी नमूद केलं.

काय आहे प्रकरण ?

रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली असल्याचे बोलले जात आहे .

जरे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून अवघ्या काही तासांत आरोपीस गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.मात्र कथित मुख्य सूत्रधार असलेला पत्रकार बाळ बोठे हा अद्याप फरार आहे.


शेअर करा