पुण्यात हरवली माणुसकी , भाजप आमदाराच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू झाल्यावर चौकशीला सुरुवात 

शेअर करा

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून  माणुसकी हीन झालेल्या ह्या रुग्णालय प्रशासनाने मुजोरपणा केल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातील प्रसिद्ध अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ही घटना आहे. 

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या गर्भवती होत्या. त्यांना प्रसुतीवेदनेचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेलं मात्र तिथे गेल्यावर रुग्णालय प्रशासन हे 10 लाख रुपयाच्या डिपॉझिटसाठी अडून राहिले. महिलेच्या नातेवाईकांनी अडीच लाख भरतो आणि बाकीचे नंतर भरतो असं सांगितलं पण तरीही रुग्णालय प्रशासनाने ऐकलं नाही, असे मयत महिलेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. 

सुरुवातीला रुग्णालय प्रशासनाने महिलेला दाखल करुन घेण्यासच नकार दिला होता मात्र महिला भाजप आमदाराच्या स्वीय सहाय्यकाची पत्नी असल्यामुळे थेट मंत्रालयातून रुग्णालयाला फोन गेला म्हणून महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी ते तयार झाले पण 10 लाख रुपये भरण्याच्या अटीवरुन महिलेवर उपचार सुरु केले नाहीत, असा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी तथा आमदार अमित गोरखे यांनी केला आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून असंवेदनशील प्रतिसाद मिळाल्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात नेलं आणि महिलेची प्रसुती झाली. महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. पण त्यांच्या आईचं निधन झालं. या घटनेमुळे नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेवर महिलेला दाखल करुन उपचार सुरु केले असते तर हा अनर्थ टळला असता असा दावा महिलेच्या नातेवाईकांनी आणि भाजप आमदाराने देखील दावा आहे.


शेअर करा