महापालिकेच्या गाळ्यात पोटभाडेकरू ठेवणाऱ्यांवर संक्रात , आयुक्तांकडून पथकाची नेमणूक

शेअर करा

अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी महापालिकेने स्वतःच्या मालकीचे भाड्याने दिलेले गाळे , वर्ग खोल्या आणि खुल्या जागांची तपासणी करावी यासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तीन पथकांची नेमणूक केलेली आहे. महापालिकेच्या मालकीचे गाळे यात मूळ मालक नसला आणि पोटभाडेकरू आढळून आला तर तात्काळ गाळा ताब्यात घेण्याचे आदेश पथकाला देण्यात आलेले आहेत सोबतच मंजूर जागेपेक्षा अधिक बांधकाम केलेले असेल तर दंडाची देखील रक्कम आकारण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत. 

महापालिकेच्या या पथकात पाच कर्मचारी असून महापालिकेच्या मालकीचे गाळे ,वर्ग खोल्या आणि खुल्या जागांची हे पथक पाहणी करेल. अनेक ठिकाणी महापालिकेच्या गाळ्यामध्ये पोटभाडेकरू ठेवून त्याच्या माध्यमातून उत्पन्न कमावण्याचे प्रकार सध्या शहरात सुरू आहेत. नगरमध्ये महापालिकेचे सुमारे 742 गाळे ,82 वर्ग खोल्या ,74 खुल्या जागा आणि दोन मंगल कार्यालय , तीन पार्क व दोन व्यायाम शाळा आहेत. 

महापालिकेच्या गळ्यामध्ये पोट भाडेकरू ठेवून महापालिकेचे कमी दराचे भाडे भरायचे आणि पोट भाडेकरूकडून मात्र दरवर्षी वाढ करत रक्कम आकारायची असे प्रकार सध्या शहरात सुरू आहेत,. महापालिकेचे भाडे देखील हे भाडेकरू वेळेला भरत नाही त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर देखील परिणाम होत आहे. गाळेधारकाने अतिक्रमण केलेले असल्यास ते पाडण्याचे देखील आदेश यशवंत डांगे यांनी दिलेले आहे. महापालिकेची आतापर्यंत या गाळेधारकांकडेच तब्बल 21 कोटी रुपयांची थकबाकी आहे .


शेअर करा