“आमचे अजितदादा त्याहीपेक्षा वर निघाले…,” फडणवीस यांची भर सभेत आगपाखड , पहा काय म्हणाले ?

शेअर करा

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या कृषी कायद्यांवरुन मोदी सरकारचे जोरदार समर्थन करत राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.दिल्लीच्या वेशीवर गेल्या एक महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरु असताना भाजपाकडून संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेले आहे . कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या कसे फायद्याचे आहेत, हे शेतकऱ्यांना समजावून सांगणे हे या यात्रेचे उद्देश आहे . देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मांजरी बुद्रूक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकारमध्ये शेतकऱ्यासंदर्भात बोलणारं कोणी नाही. शेतकऱ्याचा विचार कऱणारं कोणी नाही. पाच वर्ष सातत्याने आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय़ घेतले. अतिवृष्टी, दुष्काळ, पीक रोग प्रत्येकासाठी आम्ही पैसा दिला. शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आलं तेव्हा आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. पण आज सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पहायला तयार नाही. शेतकऱ्याचा साधा विचारही केला जात नाही,”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या घोषणा करत शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते. तिथे जाऊन शेतकऱ्याचं नुकसान होतंय आणि कमी पैसे देताय असं सांगत ५० हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे असं जाहीर केलं. कोरडवाहू आहेत त्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत द्यायचं सांगितलं. आमचे अजितदादा तर त्याहूनही वर निघाले. म्हणाले उद्धव ठाकरे तुम्ही ५० हजार म्हणता…बागायतदारांना दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्याचे कैवारी असल्याचं आम्हाला वाटलं. पण कसले दीड लाख आणि ५० हजार रुपये….राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला अशी परिस्थिती आहे”.

“आमच्या शेतकऱ्यांना सहा आणि आठ हजार रुपये घोषित केले आणि तेदेखील पोहोचले नाही. शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे,” असा संताप फडणवीसांनी व्यक्त केला.

“आपल्याला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतात….आमच्या कर्जमाफीच्या नावावर नावं ठेवत यांनी घोषणा केली. आमची कर्जमाफीची योजना संपलीच नव्हती. आम्ही निवडणूक झाल्यावर पुन्हा सुरु करु असं सांगितलं होतं. आमच्या योजनेमध्ये ४२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला. यांच्या योजनेत फक्त २९ लाख शेतकऱ्यांना झाला. आज शेतकऱ्यांसाठी एकही योजना नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.


शेअर करा