लग्नाच्या 15 दिवसानंतरच नववधूच्या पोटात पाच महिन्याचे बाळ असल्याचा ‘ धक्कादायक ‘ प्रकार उघडकीस

  • by

अल्पवयीन मुलीच्या विवाहाच्या 15 दिवसांनंतर ती 5 महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाब रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये समोर आली आहे. सदर घटना उघडकीस येताच या घटनेनंतर कुटुंब हादरून गेलं असून मुलाच्या घरच्यांनी गुहागर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, लग्न झालेली अल्पवयीन मुलगी गुहागरमधील मासू गावची आहे. सदर मुलीचं चिपळूणमधील मार्गताम्हाणे गावातल्या मुलाशी काही दिवसांपूर्वीच लग्न झालं. या लग्नानंतर दोन्हीही कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मात्र लग्नाच्या बरोबर 15 दिवसानंतर दोन्ही कुटुंबाला हादरवून टाकणारी माहिती समोर आल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार मुलाच्या घरच्यांनी पोलिसात नोंदवली आहे.

पीडित मुलीला किरकोळ स्वरूपाचा त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात नेले होते तेव्हा तपासणीदरम्यानच ती 5 महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. मुलाच्या कुटुंबियांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर गुहागर पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अल्पवयीन मुलीवर लग्नाआधी कोणी लैंगिक अत्याचार केले होते का, या अनुषंगानेही पोलीस तपास केला जाण्याची शक्यता आहे.