उपराजधानी म्हणून ओळख असलेल्या नागपूरमध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने मध्यरात्री नग्न पूजा करण्याचा बनाव रचला आणि तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून मुख्य आरोपी भोंदूबाबा असून त्याचे खरे नाव अब्दुल कुरैशी उर्फ कुणाल मदने आहे आणि तो मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. दुसरा आरोपी आशू उर्फ अश्लेष कोचे कपिलनगर पोलीस ठाणे परिसरात राहतो आणि त्याच्यासोबत असलेली त्याची मैत्रीण गायत्री ही देखील या गुन्ह्यात सहभागी आहे सोबतच आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे ज्यांनी मुलींचा शोध घेण्यासाठी मदत केली होती.
अब्दुल कुरैशी नावाच्या भोंदूबाबा याने असा दावा केला होता की मध्यरात्री नग्न पूजा केल्यास पैशाचा पाऊस पडेल. या नग्न पूजेसाठी अल्पवयीन मुलींची आवश्यकता असल्याचे त्याने आशू उर्फ अश्लेष कोचे आणि त्याच्या साथीदारांना सांगितले. पैशाच्या हव्यासापोटी अश्लेष कोचे आणि गायत्रीने त्यांच्या दोन मित्रांच्या मदतीने गरीब कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींना हेरले आणि पूजेच्या नावाखाली मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या भोंदूबाबाच्या घरी आणले. रविवारी मध्यरात्री या ठिकाणी भोंदूबाबाने नग्न पूजेचा केवळ देखावा केला नाही तर त्या या निष्पाप मुलींवर अत्यंत घृणास्पद अत्याचार केले.
पोलिसांनी अटक केलेल्या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले, जिथे न्यायालयाने त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील तिन्ही पीडित मुली अल्पवयीन आहेत. अत्याचाराच्या घटनेचे कोणतेही व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले आहे का, याचाही पोलीस कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अशा घृणास्पद कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.