निवृत्त सहाय्यक फौजदाराला रेशमी विळखा , नगरमध्ये तब्बल ‘ इतक्या ‘ लाखांची फसवणूक

शेअर करा

नगर जिल्ह्यात फसवणुकीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक अजब प्रकार सध्या अहिल्यानगरमध्ये समोर आलेला आहे. रेशीम उद्योगात गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळून देतो असे सांगत सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार यांची तब्बल 77 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. तोफखाना पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , विजय भजनराव सांगळे ( राहणार अंबिका निवास निर्मल नगर पाईपलाईन रोड ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून ते सेवानिवृत्त सहायक फौजदार आहेत. 2020 मध्ये ते पोलीस खात्यातून निवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांना प्रॉव्हिडंट फंड विमा असे एकत्रित 60 लाख रुपये मिळाले होते आणि गोविंदपुरा येथील घराची विक्री केल्यानंतर देखील त्यांना 27 लाख रुपये मिळाले होते. 

विजय सांगळे यांचा मुलगा राहुल याच्या ओळखीचे असलेले राजेंद्र अश्रुपा शेकडे ( राहणार निर्मल नगर सावेडी ) यांनी सांगळे यांना संजीवन उद्योग समूह समूहाचे मालक संदीप रामकिसन फुंदे ( राहणार पंचवटी नाशिक ) यांच्या रेशीम कारखान्याच्या उद्योगात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले. 

सांगळे यांचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील 77 लाख रुपयांची रक्कम बँकेत गुंतवणूक न करता संदीप फुंदे यांना दिली आणि त्यानंतर सांगळे यांना फ्लॅट खरेदी करण्यासाठी रक्कम गरजेची होती म्हणून त्यांनी रक्कम परत मागितली त्यावेळी रक्कम देण्यास टाळाटाळ सुरु झाली. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच फिर्यादी यांनी तोफखाना पोलिसात धाव घेतली आणि त्यानंतर संदीप फुंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा