संग्राम जगताप यांना पितृशोक, माजी आमदार अरुण जगताप यांनी पुण्यात घेतला शेवटचा श्वास

शेअर करा

अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष आणि विधान परिषदेचे दोन टर्म सदस्य अरुण जगताप यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने अहिल्यानगरसह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते. अरुण जगताप यांच्या निधनाचे वृत्त येताच शहरातील मार्केट यार्डसोबत कापड बाजार व उपनगरात व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली होती. 

अरुण जगताप यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या सारसनगर येथील राहत्या घरी ठेवण्यात आलेले असून त्यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुण्यातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो नागरिकांनी सारसनगर येथील त्यांच्या राहत्या घरी आज मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

अरुण जगताप यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याने त्यांना भेटण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले होते मात्र तरीही त्यांच्यावरील प्रेमापोटी अनेक कार्यकर्त्यांनी पुण्याकडे धाव घेतली होती. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे त्यांचे व्याही आहेत. 

माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं,  सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष,  जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि  कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.


शेअर करा