महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनाच पाठवले अश्लील मेसेज , काय आहे प्रकरण ?  

शेअर करा

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनाच चक्क अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका व्यक्तीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेले आहे. विशेष बाब म्हणजे हा व्यक्ती बीड जिल्ह्यातील असून शिक्षणासाठी पुण्यात राहत होता. त्याचे वय पंचवीस वर्षे आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अमोल छगनराव काळे ( वय 25 वर्ष ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून मूळचा तो परळी येथील रहिवासी आहे मात्र शिक्षणासाठी पुण्यातील भोसरी येथे राहत होता. पंकजा मुंडे यांच्या फोनवर सातत्याने मेसेज पाठवत तो त्यांना त्रास देत होता. सायबर पोलिसांनी संबंधित मोबाईल नंबरचे सीडीआर,लोकेशन डिटेल्स काढून तपासणी केली असता तो मोबाईल नंबर पुण्यातील भोसरी परिसरातील टाॅवरच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून आले.मग स्थानिक पुणे पोलिसांच्या मदतीने नोडल सायबर पोलिसांनी भोसरी परिसरातून अमोल काळे यास ताब्यात घेतले. 

त्याचा मोबाईल पोलीसांनी जप्त केला असुन तो न्याय वैद्यक प्रयोगशाळेत सखोल तपासणीसाठी पाठवला आहे. अमोल काळे (वय वर्षे २५) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७८,७९ आणि माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील विविध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयामार्फत त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अमोल काळे याने अशाच पद्धतीने इतर कुणाला त्रास दिला आहे का ? याचाही सध्या तपास सुरू आहे.


शेअर करा