भारतातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित वेबसाइट हॅक झाल्याचा दावा करण्यात आला असून ‘पाकिस्तान सायबर फोर्स’ या ट्विटर हँडलवरून हा दावा करण्यात आला आहे. भारतीय संरक्षण संस्थांचा संवेदनशील डेटा हॅक केल्याचा दावा या गटानं केला आहे. भारतीय लष्करी अभियांत्रिकी सेवा आणि मनोहर पर्रिकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था (IDSA) यांच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती लीक झाली आहे. यामध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक तपशीलाचा समावेश आहे.
पाकिस्तानी हॅकर्सनी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पीएसयू आर्मर्ड व्हेईकल कॉर्पोरेशन लिमिटेडची वेबसाइटही हॅक केली. या वेबसाईटवर पाकिस्तानी ध्वज आणि अल खालिद टँकचे फोटो पोस्ट करण्यात आले होते त्यानंतर आता खबरदारी म्हणून ही वेबसाइट तात्पुरत्या स्वरुपात ऑफलाईन करण्यात आली आहे, तसेच सायबर ऑडिटला देखील सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान या सायबर हल्ल्यानंतर आता भारतीय सायबर सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. पाकिस्तानकडून होऊ शकणाऱ्या संभाव्य सायबर हल्ल्यांवर सायबर सुरक्षा संस्था लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे पाकिस्तानला आता त्यांच्याच देशातून विरोध होत आहे, हे युद्ध धर्म युद्ध नाही, दोन देशांमधील युद्ध आहे, त्यामुळे सरकारच हे युद्ध लढेल. नागरिकांनी या युद्धात पडू नये असं आवाहन पाकिस्तानच्या लाल मशिदीमधील मौलवींनी केलं आहे.