अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना राणावत यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या सोशल मीडिया पोस्टबद्दल खेद व्यक्त केला असून आपली पोस्ट डिलीट केली आहे.
कंगना राणावत यांनी म्हटलं आहे की, ट्रम्प यांनी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना भारतात उत्पादन विस्ताराबद्दल केलेल्या सूचनेसंबंधी केलेली पोस्ट डिलीट करण्याची सूचना मला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली.
“माझे हे अत्यंत खासगी मत व्यक्त केल्याबद्दल मला खंत वाटते. सूचनेनुसार मी ती पोस्ट तात्काळ काढून टाकली,” असं राणावत यांनी म्हटलं. भाजप नेत्या आणि मंडीच्या खासदार कंगना राणावत यांनी एक्स (आधीचे ट्वीटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी टीम कुक यांना केलेल्या सूचनेबद्दल एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी तीन मुद्दे नमूद करत ट्रम्प यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केली होती.
ट्रम्प हे जगातील सर्वांत शक्तिशाली देशाचे नेते असले, तरी नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत, असं म्हणत कंगनाने दोघांची तुलना केली होती. तसेच ट्रम्प यांचा निर्णय राजनयिक असुरक्षिततेच्या भावनेतून आला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता.