छत्री का शिट्टी ? तहसील कार्यालयासमोर ‘ चप्पे चप्पे पे ‘ पुलिस , काय आहे परिस्थिती ?

शेअर करा

कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन असताना देखील निवडणुकीच्या भाऊगर्दीत उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी कोरोनाच्या नियमावलीला सर्वानीच तिलांजली दिल्याचे स्पष्ट झाले होते .नगर तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तब्बल 1 हजार 885 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले असून सोमवारी अकरा ते तीन या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

नगर तहसील कार्यालयासमोर आजही मोठ्या प्रमाणात गर्दी होती मात्र याआधी झालेला सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा लक्षात घेता प्रशासनाने तहसील कार्यालयात ओळखपत्र सोबत घेऊन दाखल झालेल्या उमेदवारांना तसेच फक्त शासकीय अधिकाऱ्यांना प्रवेश सुरू ठेवला होता त्यामुळे काही प्रमाणात तहसील कार्यालयात आलेली गर्दी कमी ठेवण्यात प्रशासनाला यश आले. उमेदवारासोबत आलेल्या कार्यकर्त्यांसाठी तोफखाना पोलीस स्टेशनच्या गेस्ट रूममध्ये थांबण्याची सोय करण्यात आली होती.

नगर तालुक्यातील बहुतांश गावात भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा गट आणि शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी यांच्यातच दुरंगी लढत होणार असून काही ठिकाणी मात्र गावातील तरुणांनी एकत्र येत जुन्या प्रस्थापितांच्या विरोधात आघाडी केली असल्याने त्या ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच प्रत्येक गावातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आज किती अर्ज मागे घेतले जातील याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अर्ज मागे घेण्यासाठी नेते मंडळी कडून मनधरणी देखील सुरू आहे आणि दुसरीकडे प्रशासनाकडून निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांना उद्या चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे हेदेखील गावागावातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

निवडणुकीत उमेदवारांना देण्यात येणारी चिन्हे देखील चर्चेचा विषय झाली असून काळानुसार बदल करून पूर्वी असलेली निवडणूक चिन्हांची संख्या देखील ४० वरून तब्बल १९० करण्यात आलेली आहे . चिन्हे जास्त असल्याने काही प्रमाणात सारखी चिन्हे असल्याने मतदारांचा गोंधळ देखील थांबणार असून हे एक चांगले पाऊल म्हणता येईल.

बदलत्या जमान्याला शोभतील अशी चिन्हे निवडणुकीत आली असून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच स्वयंपाक घरातील वस्तू यांचाही समावेश करण्यात आलेला आहे . ए.सी, सीसीटीव्ही कॅमेरा, माऊस, कॉम्प्युटर, लॅपटॉप, हेडफोन, लायटर, डिश अँटेना, गणकयंत्र, टीव्ही रिमोट, पेनड्राईव्ह आदी चिन्हे देखील ह्या ग्रामपंचायत निवडणुकीत धुमाकूळ घालतील. [ गुगल न्यूजला आम्हाला फॉलो करा ]


शेअर करा