रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेसाठीच्या ‘ स्टॅंडिंग वॉरंट ‘ वर काय निर्णय ?

शेअर करा

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या स्टॅंडिंग वॉरंट अर्जावर सोमवारी पारनेर येथील न्यायालयात सुनावणी करण्यात आली मात्र याबाबत निर्णय दोन दिवसानंतर दिला जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. शोध घेऊन देखील बाळ बोठे सापडत नसल्याने त्याच्याविरोधात इतर मार्गाने कारवाई करण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर तरतुदींचा आधार घेतला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 73 नुसार पोलिसांनी बाळू बोठे याच्या स्टॅंडिंग वॉरंट साठी अर्ज केलेला आहे.

न्यायालयाने पोलिसांचा अर्ज मंजूर केला तरी त्याला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांना पुन्हा न्यायालयात अर्ज दाखल करावा लागणार आहे स्टॅंडिंग वॉरंट संदर्भात काय निर्णय होणार याकडे आता पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. बाळ ज बोठे याला फरार घोषित केल्यानंतर पोलीस त्यांच्या मालमत्तेवर देखील आणू शकतात. ३० नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या होऊन देखील हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ ज बोठे यास अटक करण्यात आतापर्यंत तरी पोलीस अपयशी ठरले आहेत .

बाळ बोठे यास अटक झाली तर नगरमधील ‘ कथित हनी ट्रॅप ‘ ची पाळंमुळं खणून काढण्यात पोलीस यशस्वी होतीलच यात शंकाच नाही, मात्र अद्याप बोठे फरार आहे हे वास्तव आहे. दरम्यान पोलिसांनी पारनेरच्या न्यायालयात ‘स्टँडिग वॉरंट’ मिळवण्यासाठी अर्ज केला होता . असे वॉरंट मिळाल्यानंतर पोलिसांना राज्यात आणि अन्य राज्यांतही आरोपीचा शोध घेण्यास मदत होणार आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे .

पोलिसांनी बोठे याच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त केली असली तरी त्यांना अद्याप बोठेचा ठावठिकाणा लागलेला नाही. सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे तर उच्च न्यायालयातही त्याने याविरोधात अपील करण्यात आलेले नाही तर तो सापडत देखील नाही. त्यामुळे आता पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अटकेसाठी स्थायी वॉरंट मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला होता त्यावर आता दोन दिवसांनी निर्णय होणार आहे .

पोलिसांचा ‘ स्थायी वॉरंट’ अर्ज मंजूर झाला तर न्यायालयाचे हे वॉरंट सर्व पोलिसांना पाठविण्यात येईल. त्यामुळे नगरच नव्हे तर अन्य कोठेही तेथील पोलिसांना आरोपी दिसला तर ते पोलिसही आरोपीला अटक करू शकतात. याशिवाय आरोपीचा फोटो आणि माहितीच्या आधारे नागरिकांनाही आवाहन करता येऊ शकते. सापडत नसलेल्या आरोपीला पकडण्यासाठी ही एक प्रक्रिया असते. यापुढे जाऊन सीआरपीसी ८२ नुसार मालमत्ता जप्तीची कारवाई नंतर सुरू केली जाऊ शकते.

रेखा जरे खून प्रकरण नेमके काय ?

रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती आणि अखेर ती खरी ठरली.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली होती.

रेखा जरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे जरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बोठे देखील हजर होता तेव्हापासूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. दरम्यान याच गुन्ह्यातील इतर आरोपीना अटक होताच बोठे फरार झाला आणि अद्यापदेखील पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून लवकरात लवकर बोठे यास अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.


शेअर करा