बायकोला म्हणायचा भाजीपाला महापालिकेने उचलून नेला मात्र प्रत्यक्षात …

  • by

दिवसभर भाजीपाला विकून रात्री मात्र घरफोडी करणाऱ्या चोराला डोंबिवली पोलिसांनी पकडले आहे. घरफोड्या करून त्यातून आलेला पैसा बार मध्ये उडवत होता. काही मित्रांच्या संगतीने लागलेल्या दारूची बाटली अन् बारबालांच्या नादात तो सराईत घरफोड्या करणारा गुन्हेगार झाल्याने पोलीसही चक्रावून गेले. बबन दशरथ जाधव (वय 39 रा. इगतपुरी ) असं या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आतापर्यंत त्याने चार घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून 6 लाख 75 हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी बबन हा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका खेड्यात आपल्या कुटुंबासह राहतो. टाळेबंदीच्या काळात बबन हा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, घोटी आदी परिसरातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून कल्याणच्या घाऊक बाजारात विक्रीसाठी येत होता. यामधून त्याची दररोज चार ते पाच हजार रुपयांची कमाई व्हायची. पैसे हातात खुळखुळू लागल्याने काही मित्रांच्या नादी लागून तो डान्सबारमध्ये मद्यपान करण्यासाठी जाऊ लागला. हळूहळू त्याला दारूच्या बाटलीसह बारबालांचा देखील चांगलाच नाद लागला. नंतर दोन-दोन दिवस कल्याणमध्येच मुक्काम ठोकून तिसऱ्या दिवशी रिकाम्या हाताने घरी परतत होता.

घरी बायकोने विचारणा केली असता पत्नीला व्यवसाय झाला नसल्याचे सांगत महानगरपालिकेने सर्व भाजीपाला उचलून नेला, आदी कारणे सांगून त्याने वेळ मारून नेली मात्र काही कालावधीनंतर त्याने घरी पैसे देणे बंद केले. त्यामुळे घरी पत्नी आणि मुलांची उपासमार सुरू झाली. नंतर बारमध्ये उडवण्यासाठी पैसे कमी पडू लागल्यामुळे अखेर त्याने चोरीचा मार्ग अवलंबला. डोंबिवली परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी करण्यास सुरुवात केली.

अखेर तो मानपाडा पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चार ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली असून घरफोडीतील सर्व पैसा त्याने बाई आणि बाटलीवर उडवल्याची कबुलीही पोलिसांना दिली आहे. आता मानपाडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध इतर चार गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आणि त्याच्याकडून चार घरफोडीतील सहा लाख 75 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहे.