रेखा जरे हत्याकांड : बोठेला वाचवण्यासाठी मंत्र्याची ‘ ताकत ‘ ? कोणी व्यक्त केला संशय

शेअर करा

रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे वाचविण्यासाठी कोणा मंत्र्याने ताकद तर लावली नाही ना ? तसेच त्याला गो-बाय कोणी देत आहे का ? या प्रकरणात खूप मोठे काही तरी घडविण्याची तर योजना नाही ना? असे अनेक प्रश्न जरे कुटुंबियांतर्फे उपस्थित करण्यात आले आहेत. जरे कुटुंबियांचे वकील सचिन पटेकर यांच्यामार्फत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना हे निवेदन देण्यात आले आहे.

रेखा जरे यांच्या खूनप्रकरणात बोठे याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर महिनाभरापासून अधिक काळ बोठे फरारी आहे. त्याचा कोणताही ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस सांगत असले तरी, प्रत्यक्षात त्यांना यश आल्याचे दिसून येत नाही. यासंबंधी जिल्ह्यात चर्चाही बोठे याला कोण पाठीशी घालत आहे यावर चर्चा सुरु झाली असून बोठे लवकर हाती आला तर पोलीस दलाची देखील मान उंचावेल आणि नगरमधील कथित हनी ट्रॅपचे सूत्रधार बेनकाब होतील मात्र बोठे हाती येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर जरे कुटुंबीयांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.

जरे कुटुंबियांकडून देण्यात आलेल्या निवेदनात, ‘ गुन्हा घडल्यापासून बोठे पसार झालेला आहे. त्याचा ठावठिकाणाही पोलिसांना सापडलेला नाही. हे प्रकरण राज्यभरात गाजत असताना त्याला कसला तरी गो-बाय देण्याचा प्रयत्न होत असल्याचे जाणवत आहे. बोठे याचा इतिहास पाहिला असता त्याला शासकीय वरदहस्त आहे का? त्यातून पोलिस यंत्रणेवर दबाव येतोय का? पोलिस यंत्रणा गोंधळली आहे का? पोलिसांतील काही अधिकारी बोठेला मदत करत आहे का? असे विविध प्रश्न चर्चिले जात आहेत मात्र या प्रश्नांची उत्तरे आतापर्यंत मिळू शकलेली नाहीत.

याचा अर्थ असा की, मास्टरमाइंड असलेल्या बोठेने स्वतःच्याच नियंत्रणात सगळी परिस्थिती ठेवल्याचे दिसते. तसेच गेल्या काही दिवसांपासून नागरिक स्वतःहून पोलिसांत जाऊन गुन्हा नोंदवत आहेत. जे त्याच्या भीतीपोटी समोर येण्यास तयार नव्हते, ते आज धाडस करून समोर येण्यास तयार झाले आहेत. पोलिसांनी फिर्यादीला संरक्षण दिलेले असले तरी, यापुढे जर बोठे सापडला नाही तर, पोलिस संरक्षणात जरे कुटुंबीय किती दिवस भीतीच्या वातावरणात जगणार? असा प्रश्नही निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.

१६ डिसेंबर रोजी बोठेचा अटकपूर्व जामीन रद्द झाला आहे. परंतु अद्यापही तो उच्च न्यायालयात गेलेला नाही. याचा अर्थ त्याच्याकडून खूप मोठे काहीतरी घडवण्याचे नियोजन आहे. सदर घटनेवरून लोकांचे लक्ष विचलित करणे तसेच या केसमधील तीव्रता कमी करण्याचे नियोजन असल्याचा प्रकार सुरू असल्याचा संशय येतो, असेही निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी वेगाने तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.’

मात्र आताच हाती आलेल्या ताज्या वृत्तानुसार बाळ ज बोठे याने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला असून त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे . शोध घेऊनही बोठे सापडत नसल्याने पोलिसांच्या वतीने पारनेर न्यायालयात स्टँडिंग वॉरंट साठी अर्ज करण्यात आला आहे या अर्जाला बोठे याने ऍड. संकेत ठाणगे यांच्या वतीने आव्हान दिले आहे . स्टँडिंग वॉरंटच्या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे .

रेखा जरे खून प्रकरण नेमके काय ?

रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती आणि अखेर ती खरी ठरली.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली होती.

रेखा जरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे जरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बोठे देखील हजर होता तेव्हापासूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. दरम्यान याच गुन्ह्यातील इतर आरोपीना अटक होताच बोठे फरार झाला आणि अद्यापदेखील पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून लवकरात लवकर बोठे यास अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.


शेअर करा