महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवड , बहुतांश मंत्र्यांची ‘ ह्या ‘ नावाला पहिली पसंती

शेअर करा

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा जोरावर असतानाच बहुतांश मंत्री मात्र बाळासाहेब थोरात यांच्यासाठीच आग्रही आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका, अशी भूमिका राज्यातील बहुसंख्य मंत्र्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्यासमोर मांडल्याची प्राथमिक माहिती आहे.

दोन दिवसांपासून एच के पाटील मुंबईत येऊन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोण असावे, याची चाचपणी करत आहेत. राज्यात घडी बसली आहे. सरकार स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही समोर आहेत. अशा वेळी बाळासाहेब थोरात यांना आता बदलण्याचे औचित्य किंवा कारण दिसत नाही, अशी भूमिका अनेक मंत्र्यांनी काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्यासमोर मांडली आहे .

विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी बिगर मराठा नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याबाबतही काँग्रेसमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. बिगर मराठा नेत्यांमध्ये राज्यसभा खासदार राजीव सातव, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या नावाची चर्चा आहे तर जातीचे गणित बाजूला ठेवल्यास प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव यांची नावे चर्चेत होती.

दरम्यान, काँग्रेस प्रभारी महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नेतृत्व बदलाबाबत चर्चा झाली नाही. राज्यातील प्रश्न काय आहेत, यावर चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा झाली. आमदारांना निधी मिळत नाही, याबाबत मतं जाणून घेतली. प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत काही चर्चा झाली नाही, याबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा या प्रमुख नेत्यांसोबत मुंबईत मंगळवारी रात्री उशीरापर्यंत बराच वेळ चर्चा केली. तत्पूर्वी त्यांनी अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या तीन माजी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली होती. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या असल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचा भार कमी करण्यात यावा, अशी इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी तरुण नेत्याला संधी द्यावी. आम्ही त्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते.


शेअर करा