जाणून घ्या ‘ बर्ड फ्ल्यू ‘ बद्दल सबकुछ.. इतिहास, लक्षणे आणि उपाय

शेअर करा

बर्ड फ्लूच्या जशा बातम्या येतात, तशा कोंबड्यांच्या आणि बदकांच्या पोल्ट्री खाली केल्या जातात. लाखो पक्षांना आणि त्यांच्या पिलांना देखील मारलं जातं, चिकनचे दर एकाएकी खाली उतरतात आणि लोकांमध्ये देखील चिकन तसेच इतर मांसाहाराबद्दल दहशत पसरते. पण हा रोग आहे तरी काय ? हा कोरोनाहूनही अधिक घातक आहे का ? आतापर्यंत बर्ड फ्लूमुळं जगभरात किती लोक दगावले आहेत? याची माहिती घेणार आहोत.

बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुयेन्झा असे देखील म्हणतात. जो पक्षांच्या लाळेवाटे, विष्ठेवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये हवेच्या माध्यमातून देखील पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले तरी हा विषाणू इतरत्र पसरु शकतो. ज्या पक्षांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ते पक्षी यामुळे दगावतात. माणसांपर्यंत हा रोग पक्षांद्वारेच पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात तसेच कोंबड्या किंवा इतर पक्षांशी ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग येण्याची शक्यता जास्त असते.

बर्ड फ्लूच्या नावातील H आणि N हे नक्की काय आहे ?

बर्ड फ्लूचे अनेक उपप्रकार आहेत. त्यातील H म्हणजे हेमाग्युलेटीन (Hemagglutinin) आणि N म्हणजे न्यूरामिनीडिज (Neuraminidase) हे दोन्ही या विषाणूचे प्रोटीन स्ट्रेन आहेत. आणि याच्याच उपप्रकारांना नंबर दिलेले आहेत. H म्हणजेच हेमाग्युलेटीनचे 18 उपप्रकार आहेत तर N म्हणजेच न्यूरामिनीडिजचे 11 उपप्रकार आहेत. यातील फक्त H5, H7 आणि H10 याच स्ट्रेन माणसाच्या मृत्यू कारण ठरु शकतात. त्यामुळं H5N1 हा माणसांसाठी अधिक धोकादायक मानला जातो. यामधील H17N10 आणि H18N11 हे फक्त वटवाघुळांमध्येच आढळतात. बाकी पक्षांमध्ये याचा प्रसार होत नाही. आतापर्यंत देशात राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळमध्ये A H5N8 आढळून आला आहे तर हिमाचल प्रदेशात माणसासाठी घातक असा A H5N1 देखील आढळून आला आहे.

भारतातील बर्ड फ्लूचा इतिहास काय?

2006 साली पहिल्यांदा महाराष्ट्रातच बर्ड फ्लूनं संक्रमित पक्षी आढळले होते. महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणाऱ्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची नोंद झाली होती. त्यावेळी राज्यभरात तब्बल अडीच लाख कोंबड्या मारल्या गेल्या. तर 5 लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली. या संक्रमण काळात कुठल्याही मानवी मृत्यूची नोंद सापडत नाही.

बर्ड फ्लूची लक्षणं काय?

बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू कोरोनासोबत आणखीनच धोकादायक ठरु शकतो.

बर्ड फ्लूवर औषध आहे का?

सुदैवाने बर्ड फ्लूवर अनेक औषधे उपलब्ध आहेत. प्राथमिक स्टेजवरील बर्ड फ्ल्यू टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. त्यामुळं बर्ड फ्लू आल्यानंतर सरकार टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा साठा करणं सुरु करतं. याशिवाय रेलेन्झा, रॅपीवॅप याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेणे कधीकधी घातक देखील ठरू शकते.

दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात बर्ड फ्लूच्या अफवा उठतात आणि त्याचा परिणाम थेट पशूपालन आणि पोल्ट्री उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांवर होतो. कोंबड्यांचे दर अचानक खाली येतात आणि लाखो शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. बर्ड फ्लूमुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पाहिलं तर ते अतिशय कमी आहे. मात्र त्याचा प्रसार होऊ न देणंही गरजेचं आहे. आस्मानी-सुलतानी संकटानंतर शेतकऱ्याचं सर्वाधिक नुकसान कुठली गोष्ट करत असेल तर ती आहे अफवा.

जेव्हा बर्ड फ्लूचा प्रश्न येतो तेव्हा सरकारकडून तातडीनं पावलं उचलली जातात. जी अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र बर्ड फ्लू लगेच सगळ्या राज्यात पसरला असं होत नाही. ज्या राज्यात सध्या बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आली आहेत, तिथल्या प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, गुजरातमध्ये पशूसंवर्धन विभागानं हायअलर्ट जारी केला आहे. भारतात मांस आणि अंडी ही शिजवून आणि उकडून खाण्याची पद्धत असल्याने त्या तापमानात कोणताच विषाणू तग धरू शकत नाही मात्र बाधित जिवंत पक्षाच्या संपर्कात आल्यास माणसाला हा रोग होऊ शकतो.


शेअर करा