रेखा जरे हत्याकांड : जरे यांच्या मुलाने सरकारकडे केली ‘ ही ‘ मागणी

  • by

नगर येथील यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, या खटल्यात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी मयत रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी सरकारकडे केली आहे.

जरे यांनी त्यांचे वकील ऍड. सचिन पटेकर यांच्या मार्फत पोलिस अधीक्षकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व संबंधितांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक झाली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्याप फरार आहे. त्याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तरीही तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. यामुळे तपास रेंगाळला असून संशयाला वाव मिळत आहे.

बोठे याचा मोबाइल जप्त करण्यात आला असून त्यातून बरेच पुरावे पोलिसांना मिळणार आहेत. अशा परिस्थितीत या खटल्याची लवकरात लवकर सुनावणी होऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आरोपींना कडक कठोर होण्यासाठी या खटल्यासाठी निकम किंवा यादव यांची नियुक्ती करण्यात यावी. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आम्हाला लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या निवदेनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

पोलिसांचा स्टँडिंग वॉरंटचा अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला असल्याने बोठेपुढील अडचणी वाढल्या आहेत. या वॉरंटमुळे बोठे याला राज्यात व अन्य राज्यात पकडणे शक्य होणार आहे. पारनेर न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे पोलिसांच्या तपास कामाला मदत होणार आहे. पुढील टप्प्यात आणखी काही कायदेशीर प्रक्रियांचा आधार घेतला जाऊ शकतो.

याआधी देखील जरे कुटुंबियांकडून पोलिसांना एक निवेदन देण्यात आलेले होते त्यात , ‘ गुन्हा घडल्यापासून बोठे पसार झालेला आहे. त्याचा ठावठिकाणाही पोलिसांना सापडलेला नाही. हे प्रकरण राज्यभरात गाजत असताना त्याला कसला तरी गो-बाय देण्याचा प्रयत्न होत असल्याचे जाणवत आहे. बोठे याचा इतिहास पाहिला असता त्याला शासकीय वरदहस्त आहे का? त्यातून पोलिस यंत्रणेवर दबाव येतोय का? पोलिस यंत्रणा गोंधळली आहे का? पोलिसांतील काही अधिकारी बोठेला मदत करत आहे का? ‘ असे विविध प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आले होते.

रेखा जरे खून प्रकरण नेमके काय ?

रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती आणि अखेर ती खरी ठरली.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली होती.

रेखा जरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे जरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बोठे देखील हजर होता तेव्हापासूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. दरम्यान याच गुन्ह्यातील इतर आरोपीना अटक होताच बोठे फरार झाला आणि अद्यापदेखील पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून लवकरात लवकर बोठे यास अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.