धनंजय मुंढे राजीनामा द्या नाहीतर ..भाजपने दिला ‘ हा ‘ इशारा

शेअर करा

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा उचलून धरत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मुंडे यांनी या प्रकरणी ( करुणा हिच्याशी संबंध असल्याची बाब मात्र तक्रारदार असलेल्या रेणूशी नव्हे ) स्वत: कबुली जबाब दिला असून हे कृत्य लोकशाही संकेत, नैतिकता आणि कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यांनी पश्चाताप म्हणून स्वत:हून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा असे सांगताना मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलन करणार असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘ धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत त्यांनी राजीनामा द्यायची गरज नाही असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.धनंजय मुंडे यांनी स्वत: हून काही गोष्टी कबूल केल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत असतील तर जनता त्यांना माफ करणार नाही .मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली. यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते ‘

मुंडे यांच्याविषयी झालेल्या महिला लैंगिक शोषण प्रकरणी तपास सुरू आहे. पोलिस त्या प्रकरणाची शहानिशा करतील. दरम्यान तक्रार केलेल्या महिलेच्या बहिणीशी मुंडे यांचे पंधरा वर्षापासूनचे संबंध,दोन मुलांना स्वतचे नाव लावणे यासंबंधी त्यांनी कबुली दिली आहे. हे सर्व नैतिकता आणि कायद्याच्या चौकटीत बसत नाही. यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या राजीनाम्याची दोन, तीन दिवस वाट पाहू, नंतर भाजप राज्यभर आंदोलन करेल, असे पाटील यांनी जाहीर केले आहे.

शरद पवार यांनी गेल्या पन्नास वर्षाच्या कालावधीत नैतिकतेचे राजकारण केले आहे. त्यांनी शुद्ध राजकारण केले आहे. राजकारणाचा भाग म्हणून त्यांनी एकाला बाजूला करुन दुसऱ्याला घेतले असले प्रकार सोडले तर त्यांनी शुद्ध राजकारण केले आहे. यामुळे ते मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा नक्की घेतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. मुंडे यांच्यावर पक्षातंर्गत काय कारवाई होणार हा राष्ट्रवादीचा विषय आहे. ते मुंडे यांचा राजीनामा घेतात की उठाबशा काढायला लावतात हा त्या पक्षाचा प्रश्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.


शेअर करा