धनंजय मुंडे प्रकरणावर संजय राऊत यांची ‘ अत्यंत ‘ सावध प्रतिक्रिया

  • by

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेले बलात्काराचे आरोप व त्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप राजकीय नाहीत. वैयक्तिक आहेत. त्यातून ते मार्ग काढतील. राष्ट्रवादी काँग्रेसही यावर निर्णय घेण्यास सक्षम आहे,’ असे देखील राऊत यांनी पुढे म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळं सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरलं आहे. मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेची भूमिका मांडली.

संजय राऊत म्हणाले , ‘काही गोष्टी खासगी असतात. मुंडे यांच्यावरील आरोपांचंही तसंच आहे. तो प्रश्न त्यांच्यावरच सोडायला हवा. त्यात राजकारण आणणं योग्य नाही. राजकीय विषयावर आरोप-प्रत्यारोप करणं ठीक आहे. पण कौटुंबिक विषयात कुणीही राजकारण करू नये. कोणत्याही व्यक्तीला राजकारणात शिखरावर पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. त्यामुळं चिखलफेक करून कुणी एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणं योग्य नाही. सर्व राजकारण्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आम्ही या गोष्ट शिकलो आहोत. ‘